झोपडपट्टी सर्वेक्षणावरुन गणेश नाईकांची कोंडी!
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 02, 2024
- 467
विजय चौगुले यांच्या उपोषणाने महायुतीत धुसफूस
नवी मुंबई : 2014 च्या निवडणुकीत शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे करत आमदार गणेश नाईक यांचा पराभव करण्यात विरोधकांना यश आले होते. त्याचधर्तीवर नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी बाहेर काढून उपोषणाचे शस्त्र उचलल्याने नाईकांची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. शिंदेसेनेच्या या खेळीमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.
नवी मुंबईत झोपडपट्टीचा पुनर्विकास हा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. झोपडपट्टी सर्वेक्षण आमदार गणेश नाईक यांनी दबाव आणुन बंद केल्याचा आरोप करत 1 ऑगस्टपासून शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. चिंचपाडा गावाच्या वेशीवर ते उपोषणास बसले असून जोपर्यंत सर्वेक्षण सुरु केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्यने झोपडपट्टीवासी रस्त्यावर उतरले असून अनेक राजकर्त्यांनीही उपोषणस्थळी आपली हजेरी लावली आहे.
दहा वर्ष गणेश नाईक पालकमंत्री असून तीस वर्ष त्यांची नवी मुंबई महापालिकेत सत्ता असूनही ते झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रश्न मार्गी लावू शकले नसल्याचा घणाघाती आरोप चौगुले यांनी केला आहे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उद्य सामंत यांच्या प्रयत्नाने मुंबई झोपडपट्टी प्राधिकरणाने सुरु केलेले सर्वेक्षण नाईकांमुळे थांबले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेत 31 जुलैपर्यंत सर्वेक्षण सुरु न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी 1 ऑगस्टपासून उपोषण सुरु केल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे.
- पुनर्विकास ऐरणीवर
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा मुद्दा उचलून धरत विरोधकांनी नाईकांना चितपट केले होते. हा प्रश्न विदयमान आमदार म्हात्रे यांनी सोडवल्याने त्यांना 2019 च्या निवडणुकीत नवी मुंबईकरांनी भरभरुन मते दिली. त्यामुळे नाईकांची पुन्हा राजकीय कोंडी करण्यासाठी आता ठाणेदारांनी झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न ऐन निवडणुकींच्या तोंडावर उलचून धरल्याने नाईकांना आसमान दाखवण्याची रणनिती आखल्याची चर्चा आहे.
- महायुतीत तणाव
शिंदेसेना राष्ट्रवादी पक्ष व भाजप यांची महायुतीची सत्ता राज्यात असून ऐरोली व बेलापुर मतदार संघात भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या दोन जागांपैकी 1 जागा पदरात पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चौगुले यांचे प्यादे पुढे सरकवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिंदे यांच्या या चालीने महायुतीत तणाव निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास कसा शह देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai