कचरावेचक महिलांची रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 192
नवी मुंबई ः एक मार्च हा आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. स्त्री मुक्ती संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबईतही या दिवशी कचरावेचक महिलांची रबाळे या एमआयडीसी विभागात रॅली काढण्यात आली होती. कचरा वेचक महिलांच्या समस्या कंपनी परिसरातील लोकांना कळाव्यात या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली होती. कचरा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, आमच्या पोरांना शिक्षण द्या, म्हातारपणाची पेन्शन द्या. अशा विविध घोषणा देत महिलांनी एमआयडीसी परिसर दणाणून सोडला होता.
महिलांना एमआयडीसी विभागात फिरून कचरा वेचताना विकाऊ कचरा मिळत नाही. महिला दहा तास उन्हातान्हात फिरतात, त्यामुळे कंपन्यांनी आमच्या संस्थेशी करार करून या महिलांना एकहाती कचरा द्यावा, कंपनीने दिलेल्या ठराविक वारी व ठराविक वेळी ठरवून दिलेली व महापालिकेचे ओळखपत्र असलेली महिला येईल, कंपनीतला कचरा उचलून तिथला परिसर स्वच्छ ठेवेल अशी आमची मागणी आहे. गेली अनेक वर्ष कंपन्यांना भेटून प्रत्यक्ष बोलणे करूनही यात यश येत नाही अशी खंत स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. कंपनीतील वेगळा केलेला सुका कचरा प्रत्यक्ष दाराशी मिळाल्यास महिलांची वणवण थांबेल, यातील अनेक महिला वयस्कर आहेत, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी या कामात मदत करावी अशी अपेक्षा वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी रॅलीत सहभाग घेतला. महिलांना त्यांनी साडी वाटप केले, मार्गदर्शन करताना ते म्हणाले रबाळे विभागातील या कचरा वेचक माझ्या बहिणी असून त्यांच्या समस्या निवारण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यांचे जीवन अतिशय हलाखीचे असून दिवसभर फिरून कचरा वेचून त्या गुजराण करतात. या महिलांची मुले शिकावीत, महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मी पूवपासून सर्वतोपरी मदत करत आलो आहे, यापुढेही करेन. कंपनीमधील कचरा महिलांना मिळावा यासाठी संस्थेकडून पत्र मिळावे यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करेन. कचरावेचक महिलांना त्यांचे उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी मदत करीन, तसेच या महिलांना कचरा वेगळा करण्यासाठी पन्नास महिला काम करू शकतील अशी शेडही उपलब्ध करून देईन असे सुधाकर सोनवणे यांनी सांगितल. त्याप्रसंगी रुक्मिणी पॉल, वेणू वाघ, शकुंतला सकट यांनी कचरा वेचकांच्या समस्या मांडल्या. सेक्युरिटी, कंपनी स्वच्छ करणारे, घंटागाडीवाले हे सर्वच लोक शेलका कचरा घेतात व महिलांना अतिशय टाकाऊ कचरा मिळतो, कंपनीतील लोक कंपनीच्या बाहेरही उभे करून घेत नाहीत असे या महिलांनी सांगितले. सीमा किसवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai