श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिका सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 06, 2025
- 158
नवी मुंबई ः श्रीगणेशोत्सवास 27 ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाला असून ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी पालिकेने सुयोग्य नियोजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. 6 सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशीदीि होणाऱ्या श्रीगणेशमुर्तींच्या विसर्जनासाठीही पालिकेने सुव्यवस्थित नियोजन केले असून सर्व प्रकारची व्यवस्था स्वयंसेवकांसह सज्ज असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 143 कृत्रिम अशा 165 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह सात दिवस अशा तिन्ही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या तीन विसर्जन दिवशी 32757 श्रीमूर्तीना व 1959 गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनीही 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे आपल्या घराच्या व मंडळाच्या मंडपासासून जवळ असलेल्या कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या दिवशी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचेही विसर्जन होणार असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टि.व्ही. लावण्यात आले असून याव्दारे पोलीस विभागाचे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे.
विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट/क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे सुके निर्माल्य स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारा गर्दी लक्षात घेऊन पालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मोठ्या मंचावरून विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या श्रीगणेश मूर्तींवर पृष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai