विमानतळावर जनाक्रोश दिंडी मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 98
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते, माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत घोषणा करा, या मागणीसाठी 22 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय समितीच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई विमानतळावर जनाक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात सर्वपक्षीय नामकरण समितीची बैठक झाली असून भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सर्वपक्षीय समितीला या मोर्चाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. त्यानुसार या आंदोलनाचे नेतृत्व समिती करणार असल्याची माहिती दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे.
25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊनही नाव देण्यासंदर्भात सरकार करीत असलेल्या दिरंगाईमुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरत आहे. दिल्ली येथे सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दिबा पाटील यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली आहे. तर उद्घाटनानंतर लागलीच भूमिपुत्रांनी विमानतळाला केवळ दिबांचे नाव अशी घोषणा देत एकप्रकारे संघर्षाचे बिगूल फुंकले होते.
25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होत आहे. त्या वेळी या विमानतळाला भूमिपुत्र, बहुजनांचे राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव लागण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे एक दिवस समाजासाठी एक दिवस दिबांसाठी असा जोरदार प्रचार तरुणांमध्ये केला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव मिळावे यासाठी रायगड, ठाणे, मुंबई व पालघर या जिल्ह्यांतील स्थानिक भूमिपुत्रांनी 2021 पासून संघर्ष सुरू करीत सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी लाखो भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. त्यातूनच केंद्र व राज्य सरकारने विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी सहमती दर्शविली आहे. यासाठी वारंवार झालेल्या बैठकीत आश्वासने दिली आहेत. मात्र उद्घाटन पार पडल्यानंतरही विमानतळ नामकरणाचे आश्वासन पूर्ण होण्याची चिन्हे पुन्हा एकदा धूसर होऊ लागल्याने येथील नागरिक संतप्त झाला आहे. त्याने सरकार, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांना समाजमाध्यमातून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai