‘आकार’ घेतोय 1500 कोटींचा घोटाळा?
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2026
- 22
सिडकोच्या निष्क्रियतेमुळे शेकडो ग्राहकांची पुंजी धोक्यात
नवी मुंबई ः सिडकोने खारघर येथे 40 हजार चौ.मी. चा रहिवाशी व वाणिज्य वापराचा भूखंड विक्रिस काढला होता. सदर भूखंडाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नाही तरी संबंधित विकासकाने या भूखंडावर सूमारे 1500 कोटी रुपयांचे बुकिंग केल्याची चर्चा बाजारात आहे. भविष्यात ही निविदा प्रक्रिया रद्द झाल्यास शेकडो ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने सिडकोने याबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये सिडकोने नवी मुंबईतील नेरुळ, घणसोली, पनवेल व खारघर नोडमधील भूखंड विक्रिसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यामध्ये खारघर येथे सेक्टर 37 मध्ये सूमारे 40 हजार चौ.मी. चा रहिवाशी व वाणिज्य वापराचा भूखंड विक्रीस काढला होता. या एकाच भूखंडाच्या विक्रितून सिडकोला अडीच हजार कोटी रुपये मिळणार होते. परंतु, या भूखंडाच्या निविदा प्रक्रियेवर बोलीधारकांनी आक्षेप घेतल्याने आजतागायत या निविदेवर अंतिम निर्णय घेण्यास सिडको अपयशी ठरली आहे. दरम्यान, हा भूखंड आपल्यालाच मिळेल या आशेने विकासकाने मात्र आगाऊ बुकिंग घेणे सुरु केले आहे. आजतागायत सूमारे 1500 कोटी रुपयांचे बुकिंग झाल्याची चर्चा सध्या नवी मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात आहे.
सिडकोने विक्रि केलेले भूखंड संबंधित विकासक सिडकोसोबत भाडेकरार न होताही बाजारातून बुकिंग घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत तक्रारींद्वारे अनेकांनी सिडकोला सावध करण्याचा प्रयत्न केला असला तरी सिडकोने कोणत्याही प्रकारची पावले हा गैरकारभार रोखण्यासाठी उचललेली नाहीत. फक्त अनामत रक्कम भरुन निविदा भरण्यात येते आणि निविदा लागल्यानंतर सदर भूखंडावर सिडकोच्या परवानगीशिवाय कंटेनरचे ऑफीस थाटून ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग करुन घेण्यात येते. हे बुकिंग करताना बाजाराभावानुसार सदनिकेच्या एकुण किंमतीच्या 70% दरात ही घरे विकण्यात येतात आणि अशाप्रकारे जमा झालेला पैसा सिडकोचा पहिला हफ्ता भरुन मग सिडकोसोबत भाडेकरार करण्यात येतो. दुसरा हफ्ता भरण्यासाठी 17 महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने विकासकांकडून ही अनोखी पद्धत नवी मुंबईत अवलंबली जात आहे.
खारघर येथील सदर भूखंडावर याचपद्धतीने आगाऊ बुकिंग सुरु असल्याची चर्चा सध्या जोरात असून सिडकोने निविदा प्रक्रियेवर कोणताही अंतिम निर्णय न घेतल्याने ग्राहक हवालदिल आहेत. सदर निविदा प्रक्रिया रद्द होऊन नव्याने निविदा काढल्यास आपले बुकिंग बुडले जाण्याच्या शक्यतेने ग्राहक देव पाण्यात ठेवून आहेत. या ग्राहकांमध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच पनवेल व नवी मुंबई महापालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी आपली गुंतवणुक केल्याचे बोलले जाते. दरम्यान, हे भूखंड वाटप रद्द झाल्यास अंदाजे 1500 कोटी रुपयांचा भुर्दंड ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता सिडकोने निविदा प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. भविष्यात ग्राहकांची गुंतवणुक धोक्यात आल्यास त्याचा फटका नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai