नाईकांचा उमेदवार मैदानात उतरताच बाद
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 01, 2026
- 105
अनधिकृत बांधकाम केल्याने उमेदवारी अर्ज ठरला अवैध
नवी मुंबई ः महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून सर्वच राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने राज्यभरात अनेकांनी पक्षांतर केले, बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केले. नवी मुंबईत खरी लढत भाजपचे गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. ही लढत उमेदवारी अर्ज प्रक्रियेतही पाहायला मिळाली. भाजपचे वाशी प्रभाग क्र. 17 येथील उमेदवार अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अवैध ठरले आहेत. शिंदेसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतल्यावर छाननीअंती सदर अर्ज बाद ठरवण्यात आला.
लोकसभा निवडणुकीपासूनच नवी मुंबईमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष करुन गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसले. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा-शिंदेसेना युती होणार की नाही यावर अनेक खलबते झाल्यावर अखेर युती न करता स्वःबळावर लढण्याचा निर्णय झाला. नवी मुंबई महापालिका निवडणुक 111 जागांसाठी होणार आहे. यामध्ये उबाठा, काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसे यांची युती, तर भाजपा आणि शिंदेसेना स्वबळावर लढणार आहेत. असे असले तरी खरी लढत भाजपा विरुद्ध शिंदेसेना अशी होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 956 नामनिर्देशन पत्र दाखल झाली असून त्यातील 117 अवैध ठरली आहेत. यामध्ये भाजपच्या वाशी येथून अधिकृतरित्या अर्ज भरलेल्या प्रभाग क्र. 17 येथील उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज चौकशीअंती अवैध ठरवण्यात आला आहे. भोजने यांनी 30 डिसेंबर रोजी आपला अर्ज सादर केला. मात्र भोजने यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची हरकत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदेसेनेचे उमेदवार यांनी घेतली. हरकतीसोबत निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या तक्रार अर्जासोबत भोजने यांनी अनधिकृत बांधकाम केले असल्याचे पुरावे जोडलेे होते. उमेदवार भोजने यांनी वकीलपत्र सादर करत आपले म्हणणे मांडले. यावर सहा.आयुक्त सी विभाग यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला. सबंधित कागदपत्रे पडताळणी केल्यावर भोजने यांनी अनधिकृत बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी 24 डिसेंबर रोजी नोटीसही बजावण्यात आली आहे. चौकशीअंती निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी निलेश भोजने यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवताच शिंदेसेनेच्या शिलेदाराने नाईकांचा उमेदवार बाद केल्याने ही निवडणुक अधिक रंगणार असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत सुरु आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai