कर न वाढवण्याच्या धोरणाने सागर नाईक यांची अडचण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2026
- 24
स्थायी समितीची उत्पन्न वाढवण्यासाठी गुप्त खलबते
नवी मुंबई ः गेल्या 25 वर्षात नवी मुंबई पालिका क्षेत्रात कोणतीही करवाढ झाली नाही. यावेळी पालिका निवडणुकीत मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा 20 वर्षे करवाढ करणार नाही असे आश्वासन नवी मुंबईकरांना दिले. त्यामुळे करवाढ न करता उत्पन्न वाढवण्यासाठी ‘शाडो’ सभापती म्हणून चर्चेत असलेले माजी महापौर सागर नाईक यांनी स्थायी समितीत गुप्त खलबते केल्याची चर्चा आहे. नाईकांची कर न वाढवण्याची घोषणा आता सागर नाईक यांना अडचणीची ठरत असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जवळ जवळ सर्वच महापालिकांनी आपला अर्थसंकल्प सादर केला असून नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अद्यापावेतो मंजुर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर अर्थसंकल्प मंजुर करण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळाल्याने ते या संधीचे सोने करत असल्याचे बोलले जात आहे. पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला असून तो स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
गेला आठवडाभर स्थायी समितीत अर्थसंकल्पावर गहन चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी अशापद्धतीने काटेकोरपणे कोणतेच काम लोकप्रतिनिधींनी केले असल्याचे ऐकिवात नाही. सध्या सत्ताधारी कायद्याचा किस काढून विरोधकांसह पालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. त्यातच त्यांनी परिवहन सदस्यांची केलेली नियुक्ती ही सध्या नगरविकास विभागाची डोकेदुखी बनली असल्याने या नियुक्तीवर कोणता आदेश द्यावा याबाबत प्रधान सचिव किस काढत आहेत.
स्थायी समितीतही सत्ताधारी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखाला बोलवून त्याच्याशी तासनतास चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. गेली सहा वर्ष सत्तेत नसल्याने प्रशासकाच्या मर्जीवर सत्ताधाऱ्यांना अवलंबून राहावे लागत होते. परंतु, आता सत्ता हातात आल्याने प्रशासकीय काळात म्हणावे तशी कामे न करता आल्याने हा बॅकलॉग भरुन काढण्याचा सागर नाईक यांचा प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नाला मंत्री गणेश नाईक यांचे कर न वाढवण्याचे धोरण सागर नाईक यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या अमंलबजावणीसाठी अडसर ठरत असल्याचे बोलले जात आहे. गणेश नाईक यांनी गेल्या 25 वर्षात कोणत्याही प्रकारची करवाढ नवी मुंबईकरांवर लादली नाही. यापुढे पुन्हा 20 वर्षे करवाढ होणार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा त्यांनी पालिका निवडणुकीत केली आहे. त्यामुळे करवाढ न करता उत्पन्न कसे वाढवावे आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती कशी द्यावी या विवंचनेत माजी महापौर सागर नाईक आहेत. त्यामुळे निरनिराळ्या मार्गाने पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचे स्त्रोत ते अधिकाऱ्यांकडून समजून घेत आहेत. या प्रक्रियेमुळे स्थायी समितीत अर्थसंकल्पाला अंतिम स्वरुप देण्यास विलंब होत आहे.
- यांना आवर घाला..
दरवर्षी गटार, पदपथ, रस्ते दुरुस्ती यामधील होणारी कामे अनावश्यक केली जात असल्याची तक्रार नवी मुंबईकरांची आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात हाच प्रकार असून दर्जेदार कामे केल्यास पालिकेच्या पैशाची बचत होईल व हाच पैसा महत्वाच्या प्रकल्पांना उपलब्ध होईल असा अभिप्राय नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे नगरसेवकांना खुश करण्याच्या नादात अनावश्यक कामांना वेसण घालण्याचे धैर्य सागर नाईक यांनी दाखवावे अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत. - जनतेकडून सूचना मागवाव्यात
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा मार्ग सागर नाईक शोधत आहेत. त्यासाठी त्यांनी जनतेकडूनही सूचना मागवणे गरजेचे होते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून बचत होत नाही तर अनावश्यक खर्चात कपात करुन प्रकल्प मार्गी लावता येतात याचा विचार सागर नाईक यांनी करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai