ऑनलाईन पोर्टलव्दारे होणार स्वगणना
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 23
नवी मुंबई ः भारत सरकारने जनगणना कार्यक्रम 2027 जाहीर केला असून जनगणना कार्यक्रमाचा अंतिम कालावधी 31 मार्च 2027 रोजी आहे. भारत देशात दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची परंपरा आहे. जनगणना 2027 ही भारतातील डिजीटल पध्दतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल. स्वगणना हा एक नाविन्यपूर्ण आणि नागरिकांना सुलभ व सोयीस्कर पर्याय आहे. त्यामुळे तो स्विकारुन संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये झालेली आहे. 2027 मधील जनगणना ही 16 वी जनगणना असून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 8 वी जनगणना आहे आणि 21 व्या शतकातील 3 री जनगणना आहे. ही जनगणना दोन स्वतंत्र टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये पार पडेल आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी / मार्च 2027 मध्ये पार पडेल. जनगणना 2027 ही भारतातील डिजीटल पध्दतीने राबविण्यात येणारी पहिली जनगणना असून जनगणना प्रक्रियेच्या आधुनिकीकरणाचे हे एक परिवर्तनशील पाऊल आहे. क्षेत्रीय स्तरावरील प्रगणक व पर्यवेक्षक माहिती संकलनासाठी स्वतःचे मोबाईल उपकरण वापरून माहिती संकलन करणार आहेत व ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर डिजीटल स्वरूपात नोंद करतील. जनगणना 2027 साठी महानगरपालिका आयुक्त हे ‘प्रधान जनगणना अधिकारी’ असतील तसेच उपआयुक्त (परिमंडळ-2) हे ‘शहर जनगणना अधिकारी’ असतील. सर्व विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त हे ‘चार्ज जनगणना अधिकारी’ असतील. त्यांना ‘अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी’ हे जनगणना कामी सहाय्य करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर म्हणजेच 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल. स्वगणना हा एक नाविन्यपूर्ण आणि नागरिकांना सुलभ व सोयीस्कर पर्याय आहे. तो आपल्या सोयीनुसार सुरक्षित वेब पोर्टल वापरून नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतःहून ऑनलाईन भरण्याची मुभा देतो. याकरिता नागरिकांनी ऑनलाईन पोर्टल ला भेट द्यावी. जनगणना पोर्टलमध्ये प्रश्न आणि पर्याय मोबाईल ॲप प्रमाणेच असून वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि टूलटीप्सद्वारे उत्तरदात्यांना मदत केली जाते, उपलब्ध पर्यायांपैकी आपला योग्य पर्याय निवडून एकदा कुटुंबाने त्यांची माहिती यशस्वीरित्या सादर केली की, त्यांना एक विशिष्ट स्वगणना आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी दाखवून आपली अचूक व संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. आपली अचूक माहितीच पुढील अनेक वर्षांच्या प्रगतीची दिशा ठरवेल. ही केवळ लोकांची गणना नाही तर हा ‘विकसित भारत 2047’ चा पाया आहे.
जनगणना अधिनियम 1948 नुसार प्रत्येक व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली जाते. सर्व नागरिकांनी जनगणनेमध्ये स्वगणनेचा पर्याय स्विकारावा आणि नोंदणी करावी अथवा आपल्याकडे जनगणना माहिती संकलनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai