उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 'सरस' ला एक दिवसाची वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 24
सात दिवसांत 9 कोटींची उलाढाल
नवी मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राच्या कष्टाला, जिद्दीला आणि अस्सल कलेला नवी मुंबईकरांनी यशाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस-2026’ प्रदर्शनाचा सातवा दिवसही ‘हाऊसफुल्ल’ गर्दीचा ठरला. अवघ्या सात दिवसांत या प्रदर्शनाने तब्बल 9 कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडून एक नवा इतिहास रचला आहे. नवी मुंबईकरांचा हा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, तसेच सहभागी महिलांच्या आग्रही मागणीचा मान राखून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रदर्शनाचा कालावधी एका दिवसाने वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे प्रदर्शन 4 एप्रिलऐवजी 5 एप्रिलपर्यंत नागरिकांसाठी सुरू राहणार आहे.
महाराष्ट्राच्या चांद्यापासून ते बांध्यापर्यंतच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजिकांनी येथे आपल्या कौशल्याचे प्रदर्शन मांडले आहे. 490 स्टॉल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ही ‘स्टार्टअप क्रांती’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक महायज्ञ ठरला आहे. 7 दिवसांत 9 कोटींची उलाढाल झाल्याने सहभागी महिलांच्या डोळ्यांत यशाचे समाधान आणि ओठांवर आनंदाचे हसू उमटले आहे. ग्रामीण भागातील हस्तकला, सेंद्रिय धान्य आणि पारंपारिक वस्तूंना मुंबईसारख्या बाजारपेठेत मिळालेली ही पसंती महिलांना आनंदी करून गेली आहे. प्रदर्शनातील खाद्य विभागात खवय्यांची तुफान गर्दी उसळत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज सकाळी दालन उघडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत येथे खरेदीचा उत्साह कायम आहे. अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींनीही दररोज या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण कारागिरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
- वाढीव एक दिवस; आनंदाची पर्वणी
नवी मुंबईकरांच्या मनात हे प्रदर्शन अजून काही दिवस सुरू राहावे, अशी तीव्र इच्छा होती. लोकांची हीच भावना आणि महिलांचा उत्साह पाहून वाढवण्यात आलेला हा एक दिवस खरेदीदारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. 5 एप्रिलच्या रात्रीपर्यंत आता हे प्रदर्शन सुरू राहील. पुढचे चारही दिवस नवी मुंबईकरांनी अशाच प्रकारे उदंड प्रतिसाद देऊन ग्रामीण महिलांच्या श्रमाचा सन्मान करावा, असे आवाहन उमेद अभियानामार्फत करण्यात आले आहे. - ‘आई’ योजनेची विशेष जनजागृती
या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिला बचत गटांना आपल्या कलेचे आणि उत्पादनांचे प्रभावी प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या प्रदर्शनात हस्तकला, हँडलूम, घरगुती खाद्यपदार्थ तसेच पारंपरिक वस्तूंचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘आई’ योजनेची विशेष जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी मोहित सावळा तसेच सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कोकण विभागातील स्टॉल्सची पाहणी केली आणि महिला उद्योजकांशी थेट संवाद साधला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai