निमंत्रण पत्रिकेवरुन महायुतीत कलगीतुरा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 25
पालकमंत्र्यांचे नाव वगळल्याने शिंदे गट आक्रमक; आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नवी मुंबई ः महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. आ.मंदा म्हात्रे यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, निमंत्रण पत्रिका प्रोटोकॉलनुसार असल्याचे महापौर यांनी सांगितले. तर कार्यक्रमावेळी आ. गणेश नाईक यांनीही कोणाचे नाव न घेता विरोधकांवर तोफ डागली.
महापालिकेच्या आरोग्य सेवा बळकटीकरण उपक्रमांतर्गत वाशी रुग्णालयात विविध वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गणेश नाईक यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह निषेधाचे निवेदन आयुक्तांकडे सादर केले. तसेच महापालिका मुख्यालयात नगरसचिवांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करून कार्यक्रमावर थेट बहिष्कार टाकला. व्यासपीठावर जाणे टाळून त्यांनी माध्यमांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. “माझ्या मतदारसंघातील प्रकल्पांसाठी ऐरोलीच्या आमदाराने निधी दिल्याचे दाखविण्यामागचे प्रयोजन काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘नवी मुंबई महापालिकेत सध्या कुंपणच शेत खात आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावरही निशाणा साधला. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान मंदा म्हात्रे यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थिती निवळण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हस्तक्षेप करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी झालेल्या प्रकारानंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी (16 जून) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली.
राजाने राजासारखे वागले पाहिजे. कारण मागून मिळते त्याला भीक म्हणतात, न मागता मिळतो तो सन्मान असतो. सन्मान ज्याचा करा, जो पात्र असतो. अपात्र लोकांचा सन्मान तुमच्या प्रोटोकॉलप्रमाणे करा, असे टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका आरोग्य सुविधांच्या शुभारंभप्रसंगी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
निमंत्रणाचे महासभेत पडसाद
- निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांचे नाव वगळण्यामागे प्रशासनाची चुक आहे की शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला यावरुन सत्ताधारी भाजप व शिंदे गट यांच्यामध्ये गुरुवारीझालेल्या महासभेत खडाजंगी झाली.
- 2014 चा जीआर स्थानिक संस्थांच्या कार्यक्रमांना लागू होत असून 2025 चा जीआर शासकीय कार्यक्रमांशी संबंधित असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले.
- यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही जीआर मध्ये स्पष्टता नसल्याने शासनाकडे याबाबत लेखी मार्गदर्शन मागविण्यात आल्याचे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai