दि. बा. पाटील नामकरणाच्या लढ्यात दडपशाही
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 09, 2026
- 24
भुमीपुत्रांच्या आंदोलनाला पोलिसी कारवाईचे गालबोट
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी हजारो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, महिला, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकवटले असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून आंदोलनकर्त्यांना अक्षरशः घेरले. मोर्चा सुरू होताच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आणि शांततेने होणाऱ्या आंदोलनाला पोलिसी कारवाईचे गालबोट लागले. त्यानंतरही काही आंदोलक सानपाड्यात पोहचलेच. ‘लोकशाहीत न्याय मागण्याचाही अधिकार उरला नाही का?’ असा संतप्त सवाल यावेळी भूमिपुत्रांनी केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षे येथील प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्र करत आहेत. यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने, बैठका झाल्या. रश्मिता पोपेटा यांनी केलेल्या उपोषणानंतर दि. बा. पाटील नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. 10 दिवस उपोषणही केले मात्र सरकारने व येथील एकाही स्थानिक प्रकल्पग्रस्त आमदार, खासदार व नेत्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. सरकारने वेळोवेळी आश्वासने दिली आहेत. मात्र कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने नामकरण समितीने विधिमंडळावर 8 जुलै रोजी पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून पनवेल, उरण आणि परिसरातील गावागावांत बैठका घेऊन या मोर्चाची तयारी करण्यात आली होती. हजारो लोक विधिमंडळावर पायी जाणार असल्याने प्रशासनानेही मोठी तयारी केली होती. मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी संपूर्ण नियोजन उधळून लावले.
सरकारने लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनालाच घाबरून दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, पनवेल शहरात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर घोषणांचा गजर, पोलिसांशी शाब्दिक चकमक, महिलांचा आक्रोश आणि आंदोलकांना पोलिसांच्या वाहनांत बसविण्याची धावपळ अशा घडामोडींमुळे संपूर्ण परिसर काही काळ रणांगण बनले होते. पोलिसांनी सकाळीपासून पनवेल शहराला वेढा घातला होता. जागोजागी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले होते. मोर्चाला प्रारंभ होताच पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने हटवून वाहनांमध्ये बसविले. यावेळी अनेक ठिकाणी शाब्दिक वाद झाले, काही ठिकाणी धक्काबुक्की आणि झटापटही झाली. मात्र पोलिसांचे कडे तोडून दिबाप्रेमी सानपाड्याला पोहचले हे फार मोठे यश आहे. आजच्या दिवसाचे आंदोलन जिंकले, पोलिस हरले, सरकार तोंडघशी पडले अशी अवस्था झाल्याची टीका करत प्रमुख नेत्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहोत, अशी घोषणा केली. पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुढच्या पंधरवड्यात बैठक बोलाविली जाईल, असे सांगितले.
या आंदोलनाचे नेतृत्व उपोषणकर्त्या रश्मिता पोपेटा यांनी केले. लोकनेते दिबा प्रेमी नामकरण समितीचे नेते खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनात महिला संघटना, कलाकार संघटना, बैलगाडा संघटना, 27 गाव संघटना, 10 गाव संघटना, विविध सामाजिक संस्था, औषध विक्रेते संघटना, आगरी समाजाच्या विविध संघटना, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक महिला हातात फलक घेऊन आंदोलनात उतरल्या होत्या.
- परवानगी का नाकारली?
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडे नियमानुसार मोर्चासाठी परवानगी मागितली होती. सुरुवातीला मोर्चा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून काढण्याचा प्रस्ताव होता. पोलिसांच्या सूचनेनुसार आयोजकांनी मार्गात बदल करून पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्याचे मान्य केले. तरीदेखील अंतिम क्षणी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. परवानगी द्यायची नव्हती तर मार्ग बदलण्यास का सांगितले? सरकारला नेमकी भीती कशाची आहे? असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. सरकारला भूमिपुत्रांचा आवाज दाबायचा आहे. लोकशाहीतील आंदोलनाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. - आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव!
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच पोलिसांनी प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव उघडकीस आला. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधताना सांगितले की, यापूर्वीही रायगडमध्ये अनेक आंदोलने केली आहेत. सर्व आंदोलनांना परवानगी मिळतेच असे नाही. मात्र यावेळी पोलिसांची भूमिका दडपशाहीची असून ती निषेधार्ह आहे. आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीही सरकारवर कठोर शब्दात टीका केली. ‘नवी मुंबई विमानतळासाठी आपल्या जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांची ही लढाई आहे. या लढ्याला पोलिसी बळाने थांबवता येणार नाही. दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा संघर्ष आणखी तीव्र होईल,’ असा इशारा त्यांनी दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai