पदपथावर फांद्यांचा खच
- by मोना माळी-सणस
- Jul 09, 2026
- 65
शाळकरी विद्यार्थी, पालकांची गैरसोय; दुर्गंधीने नागरिक हैराण
नवी मुंबई : घणसोली येथील सेक्टर 9 मधील वर्दळीच्या परिसरात मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून झाडांच्या तोडलेल्या तसेच पावसामुळे पडलेल्या फांद्या तशाच पडून असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या फांद्या कुजण्यास सुरुवात झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित ठिकाणी शाळा, मंदिर आणि मैदान असल्याने विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही धोकादायक फांद्यांची पालिकेकडून छाटणी करण्यात आली असली, तरी त्या फांद्या अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, घणसोली सेक्टर 9 येथील घरोंदा परिसरातील मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावर फांद्यांचा मोठा ढीग साचला आहे. फांद्यांच्या ढिगाऱ्यामुळे पदपथावरून चालणे अशक्य झाल्याने पादचाऱ्यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागत आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. परिसरात अनेक गृहनिर्माण सोसायट्या, एएसपी शाळा व हनुमान मंदिर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे विशेषतः शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थी आणि पालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असून, मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून फांद्या न उचलल्याने त्या कुजू लागल्या असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसामुळे फांद्या ओलसर राहिल्याने डास, किडे आणि इतर जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या फांद्यांमध्ये सरपटणारे प्राणी लपण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, काही ठिकाणी विजेच्या तारा पदपथावर लोंबकळत किंवा खाली पडलेल्या असून त्यामुळे आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित वॉर्ड कार्यालय आणि उद्यान विभागाने तातडीने दखल घेऊन पदपथावरील फांद्या हटवून नागरिकांसाठी सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस