एनएमएमटीच्या ताफ्यात 51 सीएनजी बसेसची भर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 15, 2026
- 36
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात 51 नवीन सीएनजी बसेसची भर पडली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या या बसेसचे नुकतेच लोकार्पण पार पडले असून या बसेस सार्वजनिक वाहतुकीसाठी सेवेत दाखल झाल्या आहेत. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. 51 नवीन सीएनजी बसेसचे लोकापर्ण घणसोली आगारात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत घणसोली आगारात संपन्न झाले. पर्यावरणपूरक, आधुनिक व प्रवासी सुविधांनी सुसज्ज अशा सीएनजी बसेसचा समावेश एनएमएमटीच्या ताफ्यात झाल्यामुळे परिवहन उपक्रमामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवासी सेवेत मोठी भर पडणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 416 बसेस कार्यरत आहेत. उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने एकूण 150 सीएनजी बसेस समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी 65 बसेस उपक्रमास प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 85 बसेस नजीकच्या कालावधीत उपक्रमास प्राप्त होणार आहेत. लोकार्पण समारंभप्रसंगी 51 सीएनजी बसेसचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी नव्या सीएनजी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे याचाही विशेष उल्लेख त्यांनी केला. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 400 महिलांना नवी मुंबई पालिका समाजविकास विभागामार्फत बसचालक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले, ज्या माध्यमातून एनएमएमटी बसेस चालवण्यासाठी आगामी काळात महिला बस चालक उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकरांना एनएमएमटी मार्फत चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रमाच्या प्रगतीसाठी व उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध निर्णयांची माहिती देत परिवहनच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी परिवहन उपक्रमाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती रविकांत पाटील, प्रभाग समितीच्या अध्यक्ष ललिता मढवी आणि इतर नगरसेवक, परिवहन समिती सदस्यस, परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले, मुख्या लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर तसेच वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai