लोकप्रतिनिधी, आयुक्त चौकशीच्या फेऱ्यात?
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 24, 2026
- 25
अनधिकृत बांधकाम प्रकरणात नोटीसा बजावलेले अधिकारी फोडणार बिंग
नवी मुंबई ः गेली तीन वर्षे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे डॉ. कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात 295 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना उत्तर देताना संबंधित अधिकारी अनधिकृत बांधकामांबाबत कारवाईस अडथळा आणणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसह तत्कालीन वरिष्ठ अधिकारी, पालिका आयुक्त व प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्तांची नावे नमुद करणार असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या या भुमिकेमुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे 4,500 अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचा उल्लेख पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात केला आहे. ही बांधकामे प्रामुख्याने घणसोली, गोठवली, सानपाडा, वाशी व नेरुळ या विभागात उभी राहिली आहेत. अनधिकृत बांधकामांचा एवढा मोठा आकडा पाहिल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ही बांधकामे झाली, त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर बांधकामे ही गेली 20 वर्षांत उभी राहिली असून या काळात अनेक पालिका आयुक्तांनी पालिकेचा कारभार हाताळला असून त्यांनी या काळात कोणती भुमिका घेतली हे गुलदस्तात राहिले आहे.
स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यमान पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहायक आयुक्त पदावर व विभाग अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या 295 अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. सदर नोटीसांना उत्तर देण्याची तयारी संबंधित अधिकाऱ्यांनी केली असून अनधिकृत बांधकामे उभी राहताना कोणत्या लोकप्रतिनिधींनी कारवाई न करण्यासाठी दबाव आणला आणि कोणत्या आयुक्तांनी याबाबत नरमाईची भुमिका घेण्याचे सांगितले याचा तपशील त्यांच्या खुलाशात देणार असल्याचे (पान 7 वर)
सुत्रांकडून कळत आहे. या खुलाशासाठी काही अधिकाऱ्यांनी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच ‘बळीचा बकरा’ बनवला जात असल्याची भावना संबंधित अधिकाऱ्यांमध्ये असून, अनधिकृत बांधकामांमागील संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताशिवाय ही बांधकामे उभी राहीली नसती हे सर्वश्रुत असून कारवाई फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवर होत असल्याने संतापाची लाट संबंधित अधिकाऱ्यांमध्ये उठली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी त्यांच्या खुलाशात नेमकी कोणती माहिती देतात आणि त्यानंतर प्रशासन तसेच न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात नाव येण्याची शक्यता असलेले काही लोकप्रतिनिधी सध्या राजकीय स्तरावर हालचाली करत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai