लोकप्रतिनिधींच्या हाती चौकशीचा ‘भोपळा’
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 07, 2026
- 195
इनक्ल्युझिव्ह हाऊसिंग घोटाळा झाला नसल्याचा अहवाल
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात झालेल्या इनक्ल्युझिव्ह हाऊसिंग घोटाळा प्रकरणी आमदार विक्रांत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठविला होता. याप्रकरणात तत्कालीन मंत्री उद्य सामंत यांनी चौकशीचे आदेश नगरविकास विभागाला दिले हेोते. याप्रकरणात प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादर केलेल्या अहवालात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात इनक्ल्युझिव्ह हाऊसिंग घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष सादर केल्याने लोकप्रतिनिधींच्या हाती चौकशीचा भोपळा पडल्याची चर्चा मंत्रालयात आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गरीबांसाठी बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचे प्रहारचे जिल्हाप्रमुख प्रविण खेडकर यांनी गंभीर आरोप पालिकेच्या नगररचना विभागावर केले हेोते. याबाबत पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी कोणतीही कारवाई न केल्याने प्रहारचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी प्रधान सचिव असीम गुप्ता यांची भेट घेतली होती. त्यातही काही प्रगती न झाल्याने अखेर आ. विक्रांत पाटील यांनी या घोटाळ्याबाबत 2025 च्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असल्याने त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी याप्रकरणात चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी याप्रकरणी प्रधान सचिव नगरविकास यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले.
प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी याबाबत डिसेेंबर 2025 मध्ये स्वतःच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली त्यामध्ये संचालक नगररचना जितेंद्र भोपळे व सहसंचालक नगररचना श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती केली. या समितीने पालिका आयुक्त कैलास शिंदे व सहसंचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यासोबत त्यांनी सादर केलेल्या अहवालावर सखोल चर्चा करुन अखेर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा आपला अहवाल शासनास सादर केला. त्यांनी पालिकाआयुक्त व सहसंचालक नगररचना यांनी सादर केलेल्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या खुलाशावरुन हा अहवाल सादर केला असल्याचे दिसत आहे. आयुक्त कैलास शिंदे व सहसंचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्या कार्यकाळात बऱ्याचशा परवानग्या दिल्या असल्याने अशाप्रकारचा अहवाल सादर केला गेला असल्याची शक्यता आहे. विकासकांनी परवडणारी घरे न बांधल्यास त्याचा विकासकांना कोणताही फायदा होत नाही असा धक्कादायक निष्कर्ष या त्रिसदस्यीय समितीने काढला असून सिडको 1 लाख 5 हजार घरे शहरात बांधत असल्याने परवडणारी घरे पालिका हद्दीत असू नये असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे सदर बांधकाम परवानग्या देताना केकाण यांनी या परवानग्या अपर सचिव नगरविकास निर्मलकुमार चौधरी यांच्या मान्यतेनेच दिल्या असल्याने आणि या मान्यतेला प्रधान सचिव असीम गुप्ता यांची मंजुर घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुर्ण नगरविकास विभागाने मिळून या घोटाळ्यावर पांघरुण टाकले असून लोकप्रतिनिधींच्या तोंडालाही पाने पुसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुर्वे यांनी दिली आहे. नगरविकास विभागाच्या या अहवालावर आ. विक्रांत पाटील व सभापती कोणती भुमिका घेतात ते येत्या अधिवेशनात नवी मुंबईकरांना पाहायला मिळेल.
- चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल
पालिका आयुक्त कैलास शिंदे व सहसंचालक सोमनाथ केकाण यांनी अनेक प्रकरणात चौकशी समितीची दिशाभूल करणारा व चुकीचा अहवाल दिल्याचे त्यांनी सोबत जोडलेल्या प्रपत्र अ व ब वरुन दिसत आहे. अनेक प्रकरणात चुकीच्या नियमांचा आधार घेऊन संबंधित विकासकांना परवडणाऱ्या घरांच्या अटीतून का मुक्त केले? याचे विवरण दिले आहे. सदर खुलासा हा सकृतदर्शनी खोटा व दिशाभूल करणारा आहे हे माहित असतानाही चौकशी समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बचावासाठी हा अहवाल बनवल्याचे दिसत आहे. - हितसंबंधातील संघर्ष
10 लाख लोकसंख्या असलेल्या पालिकांसाठी 4000 चौ.मी. क्षेत्राच्या वरील गृहप्रकल्पात 20 टक्के क्षेत्रावर परवडणारी घरे बांधणे बंधनकारक आहे. भुखंड निविदेद्वारे विकताना सिडकोने ही अट करारनाम्यात न टाकल्याने त्याचा लाभ पालिका अधिकाऱ्यांनी विकासकांना दिला. त्यामुळे जेवढ्या गरीबांच्या घरांचे नुकसान सिडकोने केले तेवढी घरे पीएम योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात आरक्षित करणे गरजेचे होते. परंतु, प्रधान सचिव नगरविकास, पनवेल व नवी मुंबई महापालिका आयुक्त हे सिडकोचे पदसिद्ध संचालक असल्याने त्यांनी सिडकोच्या हितसंबंधांना प्राधान्य देवून गरीबांच्या स्वप्नांना तिलांजली दिली. - प्रपत्र क गायब
सादर केलेल्या चौकशी अहवालात पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सादर केलेल्या खुलाशातील महत्वाचे प्रपत्र क गायब असल्याचे दिसत आहे. एवढा गंभीर विषयावर अहवाल सादर करताना समितीने याची दखल घेतली नसल्याचे किंवा जाणिवपुर्वक प्रपत्र क अहवालात जोडले नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai