अनंत चतुर्दशीला 8573 गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 32
189 विसर्जनस्थळी महापालिकेची चोख व्यवस्था; 1420 शाडूच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य विसर्जन व्यवस्थेमुळे अनंत चतुर्दशीचा गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. शहरातील 189 विसर्जनस्थळांवर एकूण 8573 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 8125 घरगुती आणि 448 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. पहाटे 5.30 वाजेपर्यंत विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती.
बेलापूरमध्ये 1300, नेरुळमध्ये 1019, वाशीमध्ये 1063, तुर्भेत 471, कोपरखैरणेत 1239, घणसोलीत 2114, ऐरोलीत 816 आणि दिघ्यात 394 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. दिघ्याअंतर्गत 14 गावांमध्येही 157 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापौर सुजाता पाटील यांनी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांनी विविध विसर्जनस्थळांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. 1420 महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले. यंदा 1420 शाडू मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशा नागरिकांचा ‘पर्यावरण व स्वच्छतामित्र’ प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. विसर्जनस्थळांवर ओले व सुके निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा तब्बल 10 टन 950 किलो निर्माल्याचे संकलन करण्यात आले. हे निर्माल्य तुर्भे येथील प्रकल्पस्थळी नेऊन त्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया करण्यात येत आहे.
महापालिकेच्या 156 कृत्रिम तलावांसह नैसर्गिक विसर्जनस्थळी स्वयंसेवक, लाइफगार्ड, अग्निशमन जवान आणि सुरक्षा यंत्रणा तैनात होती. सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग, प्रकाशयोजना, जनरेटर, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, तराफे, फोर्कलिफ्ट आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊनही विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकरांचे अभिनंदन करून आभार मानले.
नागरिकांकडून महानगरपालिका व पोलीस यांच्याकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai