रोजगार महाकुंभातून 1,450 रोजगार संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 25
नवी मुंबई ः नवी मुंबईतील मेळाव्यात 32 नामांकित उद्योजकांचा सहभाग; युवकांच्या कौशल्य विकासावरही भरनवी मुंबई : सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने कोकण व नाशिक विभागात एकाच दिवशी 418 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यात 43 ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले असून, नवी मुंबईतील रबाळे येथे आयोजित रोजगार महाकुंभात 32 उद्योजक सहभागी झाले. या मेळाव्यात युवक-युवतींसाठी तब्बल 1,450 रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
रबाळे येथील ठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या () कार्यालयात आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ मेळाव्यास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी भेट देऊन उपस्थित युवकांशी संवाद साधला. बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार युवकांनी आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने वाढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार मिळविण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली अद्ययावत कौशल्ये आत्मसात करण्यावर युवकांनी भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच उद्योजकांनीही युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्यात आवश्यक कामकाजाशी संबंधित कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण व इतर उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.नवी मुंबईच्या भविष्यातील विकासाला अनुरूप रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून, त्या अनुषंगाने आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण युवकांना मिळावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबद्ध पावले उचलत असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
या राज्यव्यापी रोजगार महाकुंभाच्या मुख्य कार्यक्रमाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेले उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण सभागृहात उपस्थित मान्यवर, उद्योजक प्रतिनिधी आणि युवकांनी पाहिले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून नवी मुंबईतील रोजगार मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. या मेळाव्यात औद्योगिक, लॉजिस्टिक्स, माहिती तंत्रज्ञान, रिटेल, टेक्स्टाईल आणि सर्व्हिस क्षेत्रातील विविध कंपन्यांनी सहभाग घेतला. भारत बिजली, नोसील, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, अपार इंडस्ट्रीज, जॉन्सन लिफ्ट्स, युटोपिया टेक, एआय बीआय स्ट्रीट, पोर्टेस्कॅप, टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज, एसके आऊटसोर्सिंग, ॲक्युमेन टेक सोल्युशन्स, लॅबटेक, काल एनर्जी, सविता ऑईल टेक्नॉलॉजी आदी 32 कंपन्यांचा यामध्ये समावेश होता.सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai