आशा स्वयंसेविकांची गर्भलिंग निदान कायदा विषयक कार्यशाळा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 23
नवी मुंबई ः ज्ञान हे जबाबदार वर्तनाचा पाया असून त्यादृष्टीने समाजात आरोग्यविषयक कामांसाठी महापालिकेच्या प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या आशा स्वयंसेविकांमध्ये गर्भलिंग निदान कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी विषयक कार्यशाळेला मिळालेला उत्तम प्रतिसाद समाधानकारक असल्याचे मत आरोग्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आशा स्वयंसेविकांसाठी आयोजित गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा विषयक माहितीपूर्ण कार्यशाळेप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे यांनी कायद्याबद्दल सर्वांना माहिती असते मात्र त्यामधील बारकावे समजण्यासाठी व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आशा स्वयंसेविकांना आपली भूमिका समजण्यासाठी व कामाची उजळणी व्हावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. समाजातील स्त्री पुरूषांचे प्रमाण समान असणे हे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असल्याने त्याविषयी सर्वांनीच सजग असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची व त्यामधील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे व गर्भातील लिंगनिदान चाचण्यांना प्रतिबंध घालणे हा कायद्याचा उद्देश साध्य होण्यासाठी समाजात मिसळणाऱ्या आशा स्वयंसेविकांची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत आशांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून समाजात वावरावे आणि अशाप्रकारची शक्यता जाणवल्यास त्वरित नमुंमपा आरोग्य विभागाच्या प्रमुखांना याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याविषयीच्या तक्रारीसाठी 104 हा टोल फ्री क्रमांक तसेच 18002334475 हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. मुख्य विधी अधिकारी अभय जाधव यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदींची विश्लेषणात्मक माहिती देत सामाजिक समतोल राखण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी किती महत्वाची आहे हे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना लागू होणाऱ्या कठोर शिक्षा व दंडात्मक तरतुदींची माहिती देत या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची खबर देणऱ्यांस न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर 1 लक्ष रक्कमेचे बक्षिस त्याचे नाव गुप्त ठेवून शासनामार्फत दिले जाते असेही त्यांनी सांगितले.
आशा स्वयंसेविकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना मालन दळवी यांनी कौटुंबिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या विषयावर आमच्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार मानले. आज सर्व क्षेत्रात मुली आघाडीवर असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च महापौरपदीही महिलाच असल्याचे त्या म्हणाल्या. मुली ह्या माहेर आणि सासर अशा दोन्ही घरांचे नाव उजळवतात, त्यामुळे मुलगा मुलगी हा भेदभावच नष्ट व्हावा यादृष्टीने जनजागृती करू व लिंगनिदान चाचणी अथवा स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही यासाठी दक्षतेने काम करू असे सर्व आशा स्वयंसेविकांच्या वतीने त्यांनी सांगितले. सेवा संकल्प अभियानांतर्गत महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबीरे, मलेरिया-डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरे, आयुष्मान कार्ड वितरण शिबिरे, रक्तदान शिबीरे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai