नवी मुंबईच्या शालेय बॉक्सर्सची दमदार मुक्केबाजी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 30
जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत 200 हून अधिक खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड
नवी मुंबई : नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2025-26’ आयोजित करण्यात आली. वाशी सेक्टर-11 येथील मरीन सेंटरच्या सुसज्ज बॉक्सिंग रिंगमध्ये झालेल्या या स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील 200 हून अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांच्या हस्ते, उपसभापती राजू (रॉबीन) मढवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बॉक्सिंगसारख्या आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्तरावरील खेळाकडे नवी मुंबईतील विद्यार्थी आणि पालकांचा वाढता कल ही सकारात्मक बाब असल्याचे गिरीश म्हात्रे यांनी सांगितले. बॉक्सिंगमध्ये दुखापतीचा धोका असल्याची सर्वसाधारण धारणा असली तरी मोठ्या संख्येने विद्यार्थी या खेळात सहभागी होत असल्याने पालकांमध्येही खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच विविध क्रीडा प्रकारांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांमधील सहभाग वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनी गटांमध्ये सामने घेण्यात आले. प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंनी पुढील मुंबई विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशानंतर आता या खेळाडूंसमोर विभागीय स्तरावर नवी संधी निर्माण झाली आहे. स्पर्धेचे आयोजन ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने करण्यात आले. मरीन सेंटरचे संचालक देवराज दास यांनी स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे आणि क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धांमधील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विजेत्या सर्व खेळाडूंना गिरीश म्हात्रे व राजू (रॉबीन) मढवी यांनी पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्यांची ठळक कामगिरी
14 वर्षांखालील मुले : लकी निशाद, समर्थ ताटे, शिवरुद्रा इंगुळकर, कैवल्य थोरात, श्रेयस बाबर, संकेत करे, अविनाश प्रसाद, मीत नाईक, जय समदर, अय्यान वास्कर यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.
17 वर्षांखालील मुले : अराफत मुलानी, अथर्व बदापुरे, अली खान, विघ्नेश पाठक, शौर्य कुलकर्णी, वंश पाटील, दिनेश बुगाटी, याहा नाखवा, जाहीद सोफी, ओमकार ताकवडे, दुर्वेश गोकर्णकर, कैसर शेख आणि अंश राय यांनी विविध वजनी गटात बाजी मारली.
19 वर्षांखालील मुले : वेदांत कोरडे, सनी कुशवाह, प्रथमेश सणस, अनिरुद्ध निकम, साहिल अब्बास सय्यद, प्रियान्शु दुधाने, लॅनिश कुंडीत, जोशुआ फलकाव, आर्यन दासगुप्ता आणि मुकूंद के यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
17 वर्षांखालील मुली : आर्या शिंदे, मनस्वी हांडे, रिया बेहरा, रुशिता धुमाळ, हर्षाली भोईर, श्रावणी पाटील, मिहीका लाले, भाव्या वाघमारे, शिवान्या जाधव, रिद्धी पावसे, वेदिका सत्रे आणि विजबाला ए यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळविले.
19 वर्षांखालील मुली : लक्ष्मी सरोज, प्रितीका गौडर, प्राची आनंद, मनदीप कौर सैनी, प्रिया यादव, निधी चाळके, श्रद्धा यादव आणि हर्षिनी पांडे यांनी विविध वजनी गटात प्रथम क्रमांक संपादन केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai