हिवाळी प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांना ‘अलर्ट’
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 06, 2026
- 32
एमपीसीबीचा ॲक्शन मोड ; उद्योग, आरएमसी प्लांट व स्टोन क्रशरना धूळ नियंत्रणाचे आदेश
नवी मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) हवेची गुणवत्ता हिवाळ्यात आणखी खालावण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) उद्योग, बांधकाम प्रकल्प, आरएमसी प्लांट आणि स्टोन क्रशर यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या जनहित याचिकेमधील आदेशांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
हिवाळ्यात कमी वाऱ्याचा वेग, कमी मिश्रण उंची आणि त्यामुळे प्रदूषित हवा वरच्या दिशेने परसण्यास अडथळा आल्यामुळे जमिनीजवळ प्रदूषक वातावरणात साचतात. त्यामुळे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावते. या पार्श्वभूमीवर एमपीसीबीने उद्योगांना प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना बंधनकारक केल्या आहेत. उद्योगांनी स्क्रबर, बॅग फिल्टर, सायक्लोन, डस्ट कलेक्टर, ईएसपी यांसारखी प्रदूषण नियंत्रण उपकरणे सातत्याने कार्यरत ठेवावीत. लोडिंग, अनलोडिंग, क्रशिंग, स्क्रीनिंग, ग्राइंडिंग आणि साहित्य वाहतुकीदरम्यान धूळ उडू नये यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धूळ निर्माण होणाऱ्या ठिकाणी नियमित पाणी फवारणी करणे तसेच अंतर्गत रस्ते पक्के व स्वच्छ ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. वाऱ्यामुळे धूळ उडण्याची शक्यता असलेला कच्चा माल, तयार उत्पादने, वाळू, खडी, फ्लाय ॲश, स्लॅग आणि कचरा झाकलेल्या शेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. धूळ निर्माण करणारे साहित्य वाहून नेणारी वाहनेही पूर्णपणे झाकलेली असावीत. आवश्यक ठिकाणी वाहनांच्या चाकांसाठी वॉशिंग सुविधा कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
औद्योगिक परिसरात औद्योगिक कचरा, महानगरपालिकेचा कचरा, बायोमास, पॅकेजिंग साहित्य किंवा कोणताही ज्वलनशील पदार्थ उघड्यावर जाळण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त इंधनाचाच वापर करण्याचे आदेश देण्यात आले असून डिझेल जनरेटरचा वापर कमीत कमी करण्यास सांगण्यात आले आहे. उद्योगांनी स्टॅक उत्सर्जन, अनियंत्रित उत्सर्जन आणि सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण करावे. ऑनलाइन सतत उत्सर्जन निरीक्षण प्रणाली कार्यरत ठेवून संबंधित सर्व्हरशी संपर्क कायम ठेवण्याचेही निर्देश आहेत. प्रदूषण नियंत्रण यंत्रणेत बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करून सुधारात्मक कारवाई करावी. एमपीसीबीच्या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची तपासणी केली जाणार आहे.
- उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा
निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पर्यावरणीय कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल. यात कामकाज थांबविणे, सुविधा खंडित करणे तसेच बँक गॅरंटी जप्त करण्यासारख्या कारवाईचा समावेश असू शकतो. एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी संजय आय. एल. भोसले यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी हे निर्देश जारी केले असून, हिवाळ्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत तातडीने करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai