पहिल्याच ई-कचरा मोहिमेत 500 किलोहून अधिक कचरा संकलित
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2026
- 35
845 टोनरसह संगणक साहित्य जमा
नवी मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि ई-कचऱ्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या पहिल्या ई-कचरा संकलन मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आपला ई-कचरा, आपली सामूहिक जबाबदारी’ या संकल्पनेअंतर्गत गुरुवारी, 22 ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालयात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत 500 किलोहून अधिक निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक साहित्य संकलित करण्यात आले. यामध्ये 845 टोनर, 58 की-बोर्ड, 47 माऊस, 10 सीपीयू, 10 मॉनिटर, 29 केबल्स आणि 10 पॉवर सप्लाय युनिट्सचा समावेश आहे.महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका रेखा म्हात्रे व संतोषी म्हात्रे यांनी महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावरील संकलन केंद्राला भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजुसिंह चव्हाण उपस्थित होते.
भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खनिज मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन, आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सर्व विभागांना 22 ऑक्टोबर रोजी वापरात नसलेली, नादुरुस्त आणि कालबाह्य इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहर अभियंता, विधी, परवाना, वाहन, शिक्षण, संगणक, लेखा, आरोग्य आणि अतिक्रमण यांसह विविध विभागांनी ई-कचरा जमा केला.
या मोहिमेत मंत्रालयाकडे अधिकृतरीत्या नोंदणीकृत असलेल्या ‘वुई द रिसायकलिंग कंपनी’ या संस्थेमार्फत ई-कचरा संकलित करण्यात आला. संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. पायल नांदुरकर आणि डॉ. वृषभ शहा यांनी संकलित ई-कचऱ्यावर पुढे कोणती शास्त्रीय प्रक्रिया केली जाते, याची माहिती महापौर आणि उपमहापौरांना दिली. जुने संगणक, टोनर, कार्ट्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची अयोग्य विल्हेवाट लावल्यास त्यातील घातक घटकांमुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होऊ शकतात. त्याचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ई-कचरा सामान्य कचऱ्यात मिसळण्याऐवजी स्वतंत्रपणे संकलित करून अधिकृत यंत्रणेमार्फत त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ई-कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाट याबाबत जनजागृती करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
- शाळा, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्येही मोहीम
नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी ई-कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पहिल्या मोहिमेतून मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या आणि महापालिकेच्या अन्य विभागांमध्येही ई-कचरा संकलन मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन आहे. ही मोहीम नियमितपणे राबविण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. ई-कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्याची सवय नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai