दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 29
मदतीसाठी प्रयत्नशील : मंत्री आशीष शेलार
रायगड : दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पनवेल तालुक्यातील कळेगाव येथे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात सहभागी होताना आदिवासी बांधवांसोबत सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केली. आईच्या निधनानंतर गेल्या 10 ते 12 वर्षांत दिवाळीचा आनंद मनापासून अनुभवता आला नव्हता; मात्र आखाडवाडीतील आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळीचा फराळ घेताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी येथे आयोजित या स्नेहमेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, अविनाश कोळी तसेच आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदतराज्यातील 305 तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूव प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा केली आहे. पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळात जोरदार मागणी करणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आदिवासी समाजाच्या लोककला, पारंपरिक नृत्य आणि गायनाचे जतन करण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून आदिवासी आणि दुर्गम भागांतील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचत असल्याचे सांगितले. कोविड काळातही गरीब कुटुंबांना आर्थिक मदत आणि मोफत अन्नधान्य देण्यात आले. आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते, समाजमंदिरे, घरकुल आणि अन्य विकासकामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दुष्काळी परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी तसेच आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. अटल सेतू, कनेक्टिंग लिंक आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून या विकासाचा लाभ आदिवासी बांधवांनाही मिळावा, त्यांना हक्काची पक्की घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- आदिवासी कुटुंबासोबत फराळ; 389 कुटुंबांना शेतीपूरक साहित्य
स्नेहमेळाव्यादरम्यान मंत्री आशीष शेलार यांनी आखाडवाडीतील आदिवासी वस्तीमधील रोशन वाघमारे यांच्या घरी जाऊन कुटुंबासोबत दिवाळीचा फराळ घेतला. जिल्हा परिषदेच्या 15 टक्के निधीतून सात आदिवासी वाड्यांमधील 389 कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचे वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य आणि लोककलांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यानंतर मंत्री शेलार आणि उपस्थित मान्यवरांनी शिरढोण येथील शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai