पुनर्विकासाचा चेंडू सिडकोच्या कोर्टात!
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 27, 2026
- 25
पालिकेचे पंख छाटण्याचा नगरविकास विभागाचा प्रयत्न
नवी मुंबई ः नवी मुंबईतील पुनर्विकासाचा प्रश्न सध्या राज्यात गाजत असून त्यावरुन दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. समुह विकासाला नाईकांनी विरोध केला असून या उलट शिंदे सेनेने त्यास पाठबळ दिले आहे. या वादात स्थानिकांचे पुनर्विकासाचे स्वप्न अपुरे राहण्याच्या शक्यतेने आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोनिर्मित घरांचा पुनर्विकास सिडकोने एक खिडकी योजनेतून करावा अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्याबाबतचा अहवाल व अभिप्राय शासनाने सिडको व महापालिकेकडून मागवल्याने पुनर्विकास सिडकोमार्फत होणार या शक्यतेने लोकप्रतिनिधींची झोप उडाली आहे.
नवी मुंबईत सिडकोनिर्मित धोकादायक घरांचा पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेकवर्ष नवी मुंबईकरांना भेडसावत आहे. दहा वर्ष सलग पालकमंत्रीपद भुषवूनही हा प्रश्न मंत्री गणेश नाईक यांना सोडवता न आल्याने प्रचंड नाराजी त्यांच्याबाबत नवी मुंबईकरांमध्ये होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांचे सहकारी किशोर पाटकर यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर नवी मुंबईत पुनर्विकासाचे पेव वाढले आहे. पुनर्विकासाचे काम आपल्याच मर्जीतील विकासकाला मिळावे म्हणून सत्ताधारी व विरोधक जंगजंग पछाडत असून जर आपल्या विकासकाला काम न मिळाल्यास पुनर्विकासात अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत.
नुकतेच घणसोलीत राबवण्यात येत असलेल्या समुह विकास योजनेमुळे सत्ताधारी व विरोधकांत संघर्षाची ठिणगी पडली आहे. मंत्री गणेश नाईक यांनी या योजनेला विरोध केला असून नगरविकास मंत्री शिंदे यांनी मात्र समुह विकास गरजेचा असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत ही योजना कार्यान्वित करण्यासाठी कंबर कसली आहे. या वादातून विकसकांवर प्रचंड दबाव नवी मुंबईत निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांचे नवीन घराचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोनिर्मित घरांचा पुनर्विकास सिडकोने करावा अशी मागणी शासनाकडे गेली अनेक वर्ष लावून धरली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनीही याबाबत शासनाला पत्र देऊन सिडकोनिर्मित घरांच्या पुनर्विकासासाठी रिडेव्हलपमेंट सेल स्थापन करुन एक खिडकी योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याची मागणी केली आहे.
नगरविकास विभागाने या पत्रांची दखल घेऊन सिडको व्यवस्थापकीय संचालक व नवी मुंबई महापालिका आयुक्त यांचेकडे त्यांचा अभिप्राय व अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले असून पुनर्विकास सिडकोमार्फत झाल्यास त्यांचे अर्थकारण बिघडण्याची शक्यता आहे. सध्या सत्ताधारी नगरसेवकांमध्येही चलबिचल असून त्यांचीही कामे मार्गी लागत नसल्याने 16-17 नगरसेवकांचा एक गट सागर नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज आहे.त्यामुळे पुनर्विकासाचे केंद्र नाईकांच्या हाती न देता ते सिडकोकडे गेल्यास त्यांनाही हवे आहे. या पार्श्वभुमीवर आ. म्हात्रे व खा. म्हस्के यांच्या पत्राची दखल घेऊन नगरविकास विभागानेही सिडकोनिर्मित घरांचे पुनर्विकासाचे हक्क सिडकोकडे देण्याची तयारी सुरु केली आहे. नगरविकास विभागाच्या या प्रयत्नांना सत्ताधारी कशापद्धतीने अटकाव करतात यावर सत्ताधाऱ्यांचे पुनर्विकासावरील अर्थकारण अवलंबून असल्याची चर्चा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai