2708 हरकती नोंदवणार्यांची पाठ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2022
- 735
3852 पैकी 1144 निवेदनकर्त्यांनी सुनावणीत नोंदवले आक्षेप
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण 3852 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. गुरुवारी पालिकेच्या मुख्यालयात झालेल्या सुनावणी दरम्यान फक्त 1144 जणांनीच आपले आक्षेप आणि सूचना संबंधित अधिकार्यांकडे नोंदवल्या. 2708 जणांनी या सूनावणीकडे पाठ फिरवल्याने या अतिरिक्त हरकतींमुळे प्रामाणिक तक्रारदारांकडे यावेळी दुर्लक्ष होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक 17 मे पुर्वी घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे गेली दोन वर्ष निवडणुक पुढे ढकलणारा निवडणुक आयोग खडबडून जागा झाल्यानंतर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने 1 फेबु्रवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करुन त्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती नवी मुंबईकरांकडून मागवण्यात आल्या होत्या. यापुर्वी एकसदस्यीय प्रभागपद्धतीने निवडणुका होत होत्या. परंतु, यावेळी त्रिसदस्यीय प्रभागपद्धतीने निवडणुका होणार असल्याने प्रारूप प्रभाग रचनेवर यावेळी विक्रमी 3852 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या होत्या.
17 फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचना हरकती/सूचना सुनावणी राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राधिकृत अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात पार पडली. त्यावर सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेल्या सुनावणीमध्ये एकूण 1144 निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या निवदेनकर्त्यांमध्ये माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक सुरज पाटील, अनंत सुतार, प्रशांत पाटील, भारती पाटील, सुदर्शन जिरगे यांचा समावेश होता. यावेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, संदीप नाईक, विजय चौगुले, आकाश मढवी, संदीप म्हात्रे हे उपस्थित होते. यावेळी भाजपा व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या प्रभागरचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून शिवसेनेने मात्र प्रभाग रचनेचे समर्थन केले आहे. पालिकेला प्रभागरचनेवर एकूण 3852 सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या परंतु, प्रत्यक्ष सुनावणीवेळी 1144 जणांनीच सहभाग घेतला. यावेळी 2700 जणांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याने आम्हाला सूचना मांडण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याची तक्रार अनेकांनी व्यक्त केली.
या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपाआयुक्त अविनाश सणस, कोकण विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी उपआयुक्त रविंद्र जाधव, जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी जिल्हा सह आयुक्त संतोष देहेरकर तसेच राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अतुल जाधव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, निवडणुक विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, शहर अभियंता संजय देसाई हे अधिकारी उपस्थित होते. सुनावणीवेळी प्राप्त झालेल्या सुचना व हरकती विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येतील असे पालिका निवडणुक अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
- एकाच प्रभागातून 1687 सूचना/हरकती
1. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातून 1687 सूचना व हरकती प्राप्त झाल्याचे पालिका निवडणुक कार्यालयाकडून सांगण्यात आले. एकाच प्रभागातून एवढ्या सूचना/हरकती प्राप्त होणे हा विक्रम असल्याची नवी मुंबई महापालिकेत चर्चा
2. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणीच्यावेळी यातील किती नागरिक उपस्थित होते याचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही. प्रभागातून किती विरोध आहे हे न्यायालयाला दाखवून देण्यासाठी केलेली खेळी असल्याचा विरोधकांचा आरोप
राजकारणातून संपवण्याचा डाव
अनेक प्रलोभने दाखवून मी वश होत नाही हे पाहून मला राजकारणातून संपवण्यासाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारी प्रभाग रचना ऐरोलीत करण्यात आली आहे. माझा आक्षेप मी नोंदवला असून याबाबत मला न्याय न मिळाल्यास मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार.- अनंत सुतार, माजी नगरसेवक
विजयीश्री खेचुन आणू
गावाचे तुकडे न करता प्रभागरचना करावी असे स्पष्ट निर्देश निवडणुक आयोगाचे असतानाही कुकशेत गावाचे तुकडे केले आहेत. याबाबत निवडणुक आयोगाककडून न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ. तेथेही न्याय न मिळाल्यास जनतेच्या न्यायालयात जाऊन विजयीश्री खेचुन आणू. - सुरज पाटील, माजी नगरसेवक
शिवसेना समाधानी
पालिका निवडणुक विभागाने केेलेली प्रभागरचना ही आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसारच केली आहे. शिवसेना या प्रभागरचनेवर समाधानी असून कोणत्याही प्रभाग रचनेला विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. - विजय चौगुले, माजी नगरसेवक
आरोपात तथ्य नाही
विरोधक करत असलेल्या आरोपांत तथ्य नसून यापुर्वी झालेली प्रभाग रचना अशाच पद्धतीने केली होती. कोणीही सर्वांना न्याय देऊ शकत नाही. त्रिसदस्यीय निवडणुक होत असल्याने अनेक प्रभागात बदल होण्याची शक्यता आहेच. काँग्रेस या प्रभागरचनेबाबत समाधानी आहे. - अनिल कौशिक, नवी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
- पालिका उपायुक्त अमरिश पटनिगिरे रडारवर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 च्या प्रभाग रचनेवरुन नवी मुंबईत हलकल्लोळ माजला आहे. गणेश नाईक आणि त्यांच्या सहकार्यांनी पालिकेने केलेली प्रभागरचना ही पालिकेच्या अधिकार्यांनी दबावाखाली महाविकास आघाडीला फायदेशीर होईल अशापद्धतीने केली असल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत नाईकांच्या गळ्यातील ताईत असलेले पटनिगिरे निवडणुकीनंतर नाईकांच्या रडारवर येणार असल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai