महागाई विरोधात महाआघाडीचा जनआक्रोश मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 13, 2022
- 725
केंद्र सरकारविरोधात नागरिकांची जोरदार घोषणाबाजी ; पोलीस बंदोबस्त तैनात
पनवेल ः पनवेल-उरण महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत असून, गॅस व भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. या दरवाढीविरोधात बुधवारी पनवेलमध्ये शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी या महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येऊन मोर्चा काढला होता. मोर्चात सामील नागरिकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पनवेल एस.टी.स्टॅन्ड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लाइन आळीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर मोर्चा टपाल नाकामार्गे कापड बाजार आणि महानगरपालिका असा प्रांत कार्यालयासमोर जाऊन धडकला. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस, इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा सतत गैरवापर, भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, बैंक घोटाळा, विक्रांत घोटाळा आदी विषयांबाबत महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान बाळाराम पाटील आणि प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते दुचाकी आणि गॅस सिलेंडरला लिंबू मिरचीचा हार घालून केंद्र सरकारच्या निर्बुद्धीची नजर उतरवण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भाजपच्या जुलमी कारभाराचा निषेध नोंदविला. केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे. मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने केंद्र सरकारविरुद्ध प्रक्षोभ दिसून आल्याचे स्पष्ट मत या वेळी बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून सर्वसामान्य नागरिकांच्या भावना व मागण्या केंद्र शासनाकडे पाठविण्याची विनंती केली.
यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस तथा महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते जी.आर.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, सतीश पाटील, जे एम म्हात्रे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शेकापचे विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील, रामदास शेवाळे आदींसह महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मोर्चा पडला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai