आंतरशालेय दिंडी स्पर्धा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 02, 2022
- 729
नवी मुंबई ः दिंडी, वारी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचे प्रतिक असून या माध्यमातून विदयार्थ्यांच्या मनावर स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती अशा मौलिक गोष्टींचे संस्कार करणे ही संकल्पनाच अभिनव असून यामधून उदयाचे सुजाण व जागरुक नागरिक घडतील असा विश्वास व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेते अभिजीत केळकर यांनी विदयार्थ्यांनी रिलिटी शो मध्ये नव्हे तर अशा प्रकारच्या सर्वांगीण विकास करणार्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका संचालित शाळांकरिता आंतरशालेय दिंडी स्पर्धा हा अभिनव उपक्रम विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अभिजीत केळकर आपले मनोगत व्यक्त करीत होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम सुप्रसिध्द अभिनेते श्री.अंशुमन विचारे यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा या व्यक्तीमत्व विकासासाठी महत्वाच्या असल्याचे सांगत आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात जा मात्र चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा असा संदेश विदयार्थ्यांना दिला. याप्रसंगी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून सुप्रसिध्द अभिनेते अंशुमन विचारे व अभिजीत केळकर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन व शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
27 जुलै रोजी या आंतरशालेय दिंडी स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 51 शाळांनी उत्स्फुर्त सहभाग घेत वारीच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे व जनजागृतीपर प्रबोधनाचे व्यापक दर्शन घडविले. प्राथमिक फेरीचे परीक्षक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनी 19 शाळांची अंतिम फेरीकरिता निवड केली. या अंतिम फेरीत निवड झालेल्या 19 शाळांची रंगीत तालीम विदयार्थ्यांना विष्णुदास भावे नाटयगृहासारख्या मोठया रंगमंचाचा सराव व्हावा यादृष्टीने 29 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या निवडक 19 शाळा समुहांची अंतिम फेरी मंगळवारी जल्लोषात पार पडली. एकंदरीतच भरगच्च उपस्थितीतील विष्णुदास भावे नाटयगृहाला भक्तीमय रुप आले होते. या स्पर्धेसाठी दिंडीच्या माध्यमातून सादरीकरणासाठी भजन, कीर्तन, भारुड, भक्तीगीत, वारीतील रिंगणसोहळा अशा स्वरूपात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, मोबाईल टॅब गेमींग गॅझेट्स अशा डिजीटल साधनांपासून व्यसनमुक्ती असे समाजप्रबोधनपर विषय देण्यात आले होते. यावर 51 शाळांनी अत्यंत आगळेवेगळे सादरीकरण केले.
- विजेतेपद राजर्षी शाहू महाराज विदयालय
अंतिम फेरीतील 19 स्पर्धकांमधून या आंतरशालेय दिंडी स्पर्धेचे विजेतेपद राजर्षी शाहू महाराज विदयालय नमुंमपा शाळा क्र.55, आंबेडकर नगर राबाडे यांनी पटकाविले. नमुंमपा शाळा क्रं.49 ऐरोली यांना व्दितीय क्रमांकाचे तसेच नमुंमपा शाळा क्र.20 तुर्भे गाव यांना तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. नमुंमपा शाळा क्र.15 शिरवणे तसेच नमुंमपा शाळा क्र.40 महापे या शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आल्या. नमुंमपा शाळा क्र.112 करावे यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषेचे तसेच नमुंमपा शाळा 55 राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय आंबेडकर नगर राबाडे यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचे पारितोषिक देण्यात आले. मनिष गजमाने या नमुंमपा शाळा क्र.92, कुकशेत मधील कीर्तनकाराच्या भूमिकेतील विद्यार्थी कलावंताला परीक्षकांनी सूचित केल्याप्रमाणे विशेष पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले. सर्व सहभागी शाळा समुहांनाही स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai