आमदार बालदींना आगरी दणका
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 25
तीन वर्षांचा सश्रम कारावास; आमदारकीवर अपात्रतेची टांगती तलवार
नवी मुंबई : उरणमध्ये 16 वर्षांपूर्वी मयुर घरत याला बेदम मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे आमदार महेश बालदीसह चौघांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. झटे यांनी दोषी ठरवून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून बालदी यांच्या आमदारकीवर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. अनेक प्रयत्नांनंतरही तक्रारदार काशिनाथ घरत यांनी कोणतीही तडजोड न केल्याने त्यांनी बालदीला आगरी दणका दाखवल्याची चर्चा परिसरात आहे.
फिर्यादी काशिनाथ घरत यांचा 22 वर्षीय मुलगा मयूर हा खारघर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. घटनेच्या सुमारे 15 दिवस आधी मयूर हा सुनील पेडणेकर यांच्या मुलीला फोन करत असल्याच्या कारणावरून उरण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या वादाचा राग मनात धरून सुनील पेडणेकर यांनी मयूरला बांबूने बेदम मारहाण केली. प्रवीण पेडणेकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर महेश बालदी यांनी त्याला पकडून ठेवल्याचा आरोप होता. गणेश पाटील यानेही मयूरला लाथांनी मारहाण केली. मुलाला मारहाण झाल्याचे समजताच काशिनाथ घरत आणि त्यांच्या पत्नी नूतन घटनास्थळी पोहोचले. यावेळी महेश बालदी यांनी नूतन घरत यांना अश्लील शिवीगाळ केली, तर प्रवीण पेडणेकर याने काशिनाथ घरत यांना मारहाण केली. सुनील पेडणेकर यांनी पिस्तूल मयूरच्या छातीवर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. जखमी मयूरवर प्रथम उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर वाशी येथील एमजीएम रुग्णालयात 21 दिवस उपचार करण्यात आले.
या प्रकरणी 5 मार्च 2010 रोजी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी जगदीश शेळकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण तडजोडीने मिटावे म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर तक्रार मागे घ्यावी म्हणून दबावही आणण्यात आल्याची चर्चा उरणमध्ये होती. परंतु, तक्रारदार काशिनाथ घरत व त्यांचे चिरंजीव मयुर घरत यांनी सदर प्रकरणी कोणतीही तडजोड न करता खंबीरपणे लढा दिल्याने बालदींना दणका देण्यात यश आले. निवडणुकीच्या कालावधीत आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने बालदींवर आगरी समाजाचा रोष होता. त्यामुळे बालदी यांना तीन वर्षांची शिक्षा झाल्याने आगरी समाजात समाधान व्यक्त होत आहे.
सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रसाद पाटील यांनी बाजू मांडली. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील ॲड. अंकित बंगेरा यांनी परस्परविरोधी तक्रारीचा आधार घेत हा खोटा गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाचे पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा दाखला ग्राह्य धरत बचाव पक्षाचे मुद्दे फेटाळून लावले. भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि 325 अंतर्गत महेश बालदीसह सुनील व प्रवीण पेडणेकर तसेच गणेश पाटील यांना प्रत्येकी तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, कलम 323 अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम 509 अंतर्गत सहा महिन्यांचा साधा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींच्या वकिलांनी शिक्षेनंतर जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो मंजूर केला असून या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे ॲड. अंकित बंगेरा यांनी सांगितले.
दरम्यान, लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतो. त्यामुळे महेश बालदी यांच्या आमदारकीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, जामीन मिळणे आणि दोषसिद्धीला स्थगिती मिळणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. अपील न्यायालयाकडून दोषसिद्धीला स्थगिती मिळते का, यावर त्यांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तब्बल 15 वर्षे 3 महिने 9 दिवस चाललेल्या या कायदेशीर लढाईचा निकाल आता राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai