बहुतांश क्षेत्रं ‘जीएसटी’च्या जाळ्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 20, 2022
- 613
मुंबईः वस्तू विकत घ्या अथवा एखादी सेवा विकत घ्या, तुम्हाला ‘जीएसटी’ तर मोजावाच लागणार आहे. आता जीवनावश्यक वस्तूंवर आणि खाद्यान्नांवर ही जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे अगदी गरिबाच्या खिश्यातून ही सरकार आगाऊ कर अलगद वसूल करत आहे. ज्या वर्गावर आतापर्यंत कराचा फारसा भार नव्हता, त्या वर्गालाही अप्रत्यक्षपणे ‘जीएसटी’ची झळ बसत आहे.
नाष्त्याच्या ब्रेडपासून रात्रीच्या दुधापर्यंत जवळपास प्रत्येक वस्तूवर देशात जीएसटी’ आकारला जात आहे. या ‘जीएसटी’मुळे जनतेवर महागाईचा जोरदार हल्ला झाला असून सरकार श्रीमंत झालं आहे. विरोधकांनी आता त्याला गब्बरसिंग टॅक्स’ असं नाव दिलं आहे. आता भाड्याचं घरही या कराच्या कक्षेत आलं आहे. 18 जुलै रोजी ‘जीएसटी कौन्सिल’ने घरभाड्याशी संबंधित नियमांमध्ये बदल केले. त्या नियमांनुसार आता काही विशेष परिस्थितीत घराच्या भाड्यावर ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. व्यावसायिक वापर किंवा कंपनीने घर भाड्याने दिल्यास ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. नियमानुसार ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणीकृत व्यावसायिक किंवा व्यक्तीने भाड्याने घर घेतल्यासही ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. भाड्यावरील ‘जीएसटी’ हा नियम आतापर्यंत व्यावसायिक मालमत्तांनाच लागू होता.
‘जीएसटी’च्या नव्या नियमात, भाडेकरूला भरलेल्या करावर ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा दावा करण्याची परवानगी दिली जाईल; मात्र वैयक्तिक वापरासाठी घर भाड्याने घेतल्यास ‘जीएसटी’ लागू होणार नाही. तसंच घर भाड्याने देणार्या व्यावसायिक, कंपनी किंवा व्यक्तीची ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणी नसेल तर हा कर आकारला जाणार नाही. एखाद्या व्यक्तीने जीएसटी’नोंदणीकृत व्यक्ती किंवा कंपनीला आपलं घर भाड्याने दिलं असेल आणि त्याची ‘जीएसटी’मध्ये नोंदणी झाली नसेल तर भाडेकरूला 18 टक्के ‘जीएसटी’ भरावा लागेल. भाडेकरूची ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणी झाली नाही तर कोणताही कर भरावा लागणार नाही. कंपनीने किंवा एखाद्या व्यक्तीने कर्मचार्याच्या वास्तव्यासाठी निवासी मालमत्ता घेतली, गेस्ट हाऊस किंवा ऑफिससाठी वापर केला तर भाडेकरूला 18 टक्के ‘जीएसटी’ भरावा लागेल. जमीनदाराची ‘जीएसटी’मध्ये नोंदणी नसली तरी हा कर भरावा लागणार आहे; मात्र घरमालक आणि भाडेकरू या दोघांचीही ‘जीएसटी’मध्ये नोंदणी नसेल तर हा नियम लागू होणार नाही. यासोबतच AAवैयक्तिक वापरासाठी घर किंवा फ्लॅट भाड्याने घेणार्यांना ‘जीएसटी’भरावा लागणार नाही.
दिवाळीनंतर भारतात लग्नसराईचा मोसम सुरू होतो. तुळशीच्या विवाहानंतर लगबग सुरू होते. त्यासाठी लग्न हॉल, तंबू, केटरर्स आदींचं बुकिंग आधीच सुरू केलं जातं. आगाऊ रक्कम जमा करुन हे बुकिंग केलं जातं. लग्नाच्या दिवशी उर्वरीत रक्कम अदा केली जाते. या सर्व व्यवस्थेसाठी जीएसटी’चा भार स्वतंत्रपणे पडणार आहे. हा भार इतका प्रचंड आहे की, लग्नात वेगवेगळ्या सेवांसाठी दहा लाख रुपये खर्च होत असतील तर या सेवांच्या बदल्यात दीड लाखांहून अधिक ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. मॅरेज गार्डनवर सर्वाधिक 18 टक्के म्हणजेच ‘मॅरेज होम्स’वर दोन लाखांच्या क्खर्चापोटी 36 हजार रुपयांचा ‘जीएसटी’ आकारला जातो. एक लाखाच्या तंबूंवर 18 हजार रुपये जीएसटी’ भरावा लागेल तर दीड लाखाच्या केटरिंगवर 27 हजारांचा ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. कपडे आणि पादत्राणांवर जीएसटी’शिवाय सजावट, बँड बाजा, फोटो-व्हिडिओ, लग्नपत्रिका, घोडागाडी, ब्युटी पार्लर आणि लायटिंगवरही 18 टक्के जीएसटी’ आकारला जातो. लग्नासाठी खरेदी केल्या जाणार्या बाकी वस्तूंवर ‘जीएसटी’चा दर पाहिला तर कपडे आणि पादत्राणांवर पाच ते बारा टक्के ‘जीएसटी’ आकारला जातो तर सोन्याच्या दागिन्यांवर तीन टक्के जीएसटी’ आकारला जातो. याचाच अर्थ तीन लाख रुपयांचे दागिने खरेदी केल्यावर जीएसटी’ म्हणून नऊ हजार रुपये ‘जीएसटी’ पोटी द्यावे लागतील. बस-टॅक्सी सेवेवरही पाच टक्के ‘जीएसटी’ भरावा लागणार आहे. आता लवकरच होणार्या जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटीवर चर्चा होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai