वेस्ट टू ‘एनर्जी’ साठी विरोधक आक्रमक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 39
प्रकल्पाची जागा न बदल्यास कचऱ्याच्या गाड्या रोखणार
नवी मुंबई : तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडवर प्रस्तावित असलेल्या 729 कोटी रुपयांच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या जागेवरून नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी प्रकल्पाला विरोध नसून, त्यासाठी निवडलेल्या जागेला आक्षेप असल्याचे स्पष्ट करत प्रकल्पाचे सुरू असलेले काम तातडीने थांबवून पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी केली आहे. याबाबत नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
नवी मुंबईत दररोज सुमारे 700 ते 800 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामुळे तुर्भे डंपिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली असून, परिसरात कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. डंपिंग ग्राउंडच्या लगत मोठी झोपडपट्टी, शाळा तसेच कंपन्या आहेत. दुर्गंधी, डास आणि कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तुर्भे येथील कचरा प्रक्रिया केंद्रात ओला आणि सुका कचरा व्यवस्थित वेगळा केला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रक्रिया केंद्रात आणलेला कचरा जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने पुन्हा डंपरमध्ये भरून डंपिंग ग्राउंडवर नेला जात असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. त्यामुळे प्रत्यक्षात किती कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, याची आकडेवारी महापालिकेने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नवी मुंबईला मिळणाऱ्या स्वच्छता पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कचरा प्रक्रिया व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पासाठी सध्याच्या जागेऐवजी प्रकल्पस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिडकोच्या ताब्यातील दगडखाणींच्या जागेचा पर्याय नगरसेवकांनी सुचविला आहे. तुर्भे आणि सिडकोच्या प्रस्तावित जागेची क्षेत्रफळ, भूवापर, लोकवस्तीपासूनचे अंतर, पर्यावरणीय स्थिती आणि तांत्रिक व्यवहार्यता या निकषांवर तुलनात्मक स्थळ-योग्यता अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंजूर डीपीआरनुसारच प्रकल्पाचे काम सुरू आहे का, याची स्पष्टता महापालिकेने द्यावी. आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या तांत्रिक परीक्षणाची नेमकी व्याप्ती काय होती, याची माहितीही सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र शासन, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कायदेशीर निवेदन देण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान, मागण्यांवर 15 दिवसांत निर्णय न झाल्यास तुर्भे डंपिंग ग्राउंडवर नवी मुंबईतील एकही कचऱ्याची गाडी खाली करू दिली जाणार नाही, असा इशारा सुरेश कुलकर्णी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दिला. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. यावेळी उपनेते तथा महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महापालिका गटनेते मनोज हळदणकर, माजी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेवक अनिकेत म्हात्रे आणि रामआशिष यादव उपस्थित होते.
- मर्सिडीजचा नक्की शेठ कोण?
सभागृह नेते सागर नाईक वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीवरुन वेस्ट टू ‘एनर्जी’ निविदेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला त्यासाठी त्यांनी काळे जॅकेट परिधान करुन त्यावर ‘729 कोटींचे टेंडर 24 तासात मर्सिडिस सरेंडर’ असा मजकूर लिहून नागरिकांचे लक्ष वेधले. सदर गाडीचे रजिस्ट्रेशन संबंधित ठेकेदाराला इरादापत्र देण्यापुर्वी 2 दिवस आधी नवी मुंबई आरटीओमध्ये झाल्याने व ती गाडी कधीकधी सागर नाईक वापरत असल्याने मर्सिडीजचा नक्की शेठ कोण? याबाबत विरोधकांचा गैरसमज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. - नाईकांचे विरोधकांना आव्हान
विरोधकांनी बिनबुडाचे आरोप आपल्यावर करु नये. त्यांच्याकडे संबंधित काही पुरावे असल्यास त्यांनी योग्य त्या प्राधिकरणाला द्यावेत. संबंधित प्राधिकरणाला मी योग्य तो खुलासा करेन असे सांगून विरोधकांच्या आरोपांतील हवा काढली. नाईक एवढ्यावरच थांबले नाही तर विनाकारण आरोप केल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai