प्रशासनाच्या टोलवाटोलवीत खेळाडूंची परवड
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 25, 2022
- 556
मैदान दुरुस्तीवरून खाजगी शाळा व पालिकेचे एकमेकांकडे बोट; क्रिडापेमींमध्ये नाराजी
नवी मुंबई : शहरात खेळाची मैदाने अपुरी असून उपलब्ध असलेल्या मैदानांनाही देखभाल दुरुस्ती अभावी अवकळा आली आहे. काही शाळांची मैदाने शाळेच्या वेळेनंतर नागरिकांसाठी खुली करण्यात येतात. तर काही शाळांना लागून असलेली पालिकेची मैदाने शाळा वापरतात. मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास मात्र टोलवाटोलवी केली जात आहे. परिणामी मैदाने बकाल झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. यामुळे खेळाडुंमध्ये नाराजी पसरली असून लवकरात लवकर या मैदानांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
नवी मुंबई शहर उभारताना विकसित नोडमध्ये शाळा, खेळ व उद्याने व इतर सामाजिक सुविधांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. मात्र खेळाची मैदाने अपुरी असल्याने क्रिडाप्रेमींना सरावासाठी मोकळ्या मैदानांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे शाळांची मैदाने शाळा सुटल्यावर नागरिकांसाठी खुली करावीत या नागरिकांच्या मागणीनुसार शाळांना तसे निर्देशित करण्यात आले. मात्र खाजगी शाळा वापरत असलेल्या मैदानांच्या देखभालीबाबत पालिका प्रशासन व शाळांमध्ये संभ्रम असून दुरूस्तीबाबत ते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे क्रिडाप्रेमींसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शाळा आणि पालिका यांच्या टोलवाटोलवीमुळे मैदान परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. अनेक मैदानांमध्ये पावसाळ्यात वाढलेले गवत तसेच असून काही मैदानांच्या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. बैठक व्यवस्था तुटल्या असून नाम फलक गायब झाले आहेत. आता क्रिडास्पर्धांचा काळ सुरु असून त्यासाठी सराव महत्वाचा आहे. मात्र स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अव्वल स्थान पटकाविलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही मैदानांची अशी दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दुरावस्थेमुळे क्रिडानगरी म्हणून उद्यास येत असलेल्या नवी मुंबईत खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानांची निगा राखणार्या महापालिकेचे या खेळाच्या मैदानांकडे लक्ष कधी जाणार असा सवाल क्रीडा प्रेमींनी विचारला आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून नवी मुंबई महानगरपालिकेस 2008-09 पासून क्रीडा क्षेत्रासाठी जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे. मात्र मैदानांचा दर्जा कधी सुधारणा याकडे क्रिडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
- जबाबदारीबाबत दोन्ही प्रशासनात एकमत नाही
शहरातील काही खाजगी शाळांच्या बाजूला असणारी मैदाने या शाळांकडून वापरली जातात. मात्र, या मैदानांची डागडुजी, देखभाल दुरुस्ती कुणी करायची याबाबत पालिका व शाळा प्रशासनामध्ये एकमत नसल्याने शाळा व्यवस्थापन व पालिका संबंधित विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहे. पालिकेची जबाबदारी असल्याचे शाळेकडून सांगण्यात येते. तर खाजगी शाळा वापरत असलेल्या मैदानांची देखभाल दुरुस्तीचे काम ही शाळेची जबाबदारी असल्याचे पालिकेच्या संबंधित विभागातून सांगण्यात येते. एकंदरीत ही टोलवाटोलवी खेळाडूंच्या भविष्यासाठी मारक ठरू शकते.
सेक्रेड हार्ट स्कूल समोरील मैदानाला बकाल स्वरूप
- वाशी सेक्टर 4 मधील सेक्रेड हार्ट शाळेसमोरील मैदानाची दुरवस्था झालेली आहे. या मैदानाची संरक्षण भिंतीची पडझड झालेली असून त्यावरील लोखंडी जाळ्या गायब झाल्या आहेत. मैदानात कचरा व गवताचे ढीग साचले आहेत.
- या ठिकाणी तळिरामांकडून रिकाम्या बाटल्या टाकल्या जात आहे. तसेच मैदानाचा नामफलक सुद्धा दिसेनासा झाला आहे. मैदानाचा लोखंडी गेट गंजला असून तुटला आहे. या मैदानाच्या जबादारी वरून शाळा व पालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने मैदानाची अवस्था पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोहिमेला आरसा दाखवणारी आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai