चुकून बँक खात्यात आलेली रक्कम परत करण्यास टाळाटाळ
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2023
- 270
साखर व्यापाऱ्याची फसवणूक
नवी मुंबई : साखर खरेदीची तब्बल 10 लाख 74 हजार रुपयांची रक्कम नजरचुकीने दुसऱ्या कंपनीच्या बँक खात्यात गेली. मात्र ही चुकून आलेली रक्कम परत करण्यास संबंधित मालकाने टाळटाळ केली आहे. त्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलिसांनी रकमेचा अपहार करणाऱ्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मुलुंड येथे राहणारे साखरेचे व्यापारी संजय कोठारी हे एपीएमसी मार्केटमधून साखरेचा व्यवसाय करतात. गेल्या फेब्रुवारीत कोठारी यांनी कर्नाटक, बेळगाव येथील मे. गोदावरी बायोरिफायनरी लि. या कंपनीकडून 33 रुपये किलो दराने 32 टन साखर मागवली होती. या कंपनीने मालाची 10.74 लाखांची रक्कम आगाऊ पाठवण्यास सांगितले होते. मात्र कोठारी यांनी ही रक्कम बेळगाव येथील गोदावरी बायोरिफायनरी या कंपनीच्या बँक खात्यात पाठवण्याऐवजी चुकून पुणे येथील गोदावारी लॉजिस्टीक कंपनीच्या बँक खात्यात पाठवली.
गोदावरी बायोरिफायनरीच्या कर्मचाऱ्यांनी रक्कम मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर, कोठारी यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी ही रक्कम त्यांनी चुकून पुणे, मावळ येथील गोदावरी लॉजिस्टीक कंपनीच्या बँक खात्यात पाठवल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोठारी यांनी गोदावरी लॉजिस्टीकचा मावळ येथील पत्ता मिळवून तिथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी कंपनीचे प्रोप्रायटर राहुल नवीन प्रभू यांची भेट घेऊन आपली रक्कम परत देण्याची विनंती केली. त्यावर प्रभू यांनी त्यांच्या ओव्हरड्राफ्ट खात्यात पैसे आल्याचे सांगून, बँकेशी संपर्क साधून रक्कम परत पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता, त्यांनी उलट ती रक्कम दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करून घेत तिचा वापर सुरू केला. तसेच वेगवेगळी कारणे सांगून कोठारी यांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर कोठारी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुल प्रभू याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai