क्राईस्ट अकॅडमी संघाची बाजी तर पालिका शाळा क्र. 36 कोपरखैरणे संघाची लक्षवेधी कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 24, 2023
- 620
17 वर्षाखालील मुलींची जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा
नवी मुंबई ः जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये क्राईस्ट अकॅडमी संघ विजयी झाला असला तरी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36, कोपरखैरणेगांवच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने लक्षवेधी कामगिरी केली. अंत्यत चुरसीच्या अंतिम स्पर्धेत स्थान पटकावून उपविजेतेपद मिळवले असले तरी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने 15 जुलै 2023 पासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36, कोपरखैरणेगांवच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने पूर्वीपासून दबदबा असणाऱ्या खाजगी शाळांच्या संघांवर मात करीत थेट अंतिम फेरी गाठून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले. अंतिम सामन्यात जरी क्राईस्ट अकॅडमी संघाविरोधात त्यांना पराभव स्विकारावा लागला तरी यापूर्वी कोणताही अनुभव नसताना पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत अनेक शाळांच्या मातब्बर संघांवर स्पर्धेतील सामन्यांत मात करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील मुलींनी संपादन केलेले हे यश लक्षवेधी आहे. मुलींच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संपूर्ण संघाचे व त्यांच्या प्रशिक्षक, शिक्षकांचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलींच्या गटात 24 शाळांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नमुंमपा शाळा क्र, 36, कोपरखैरणेगाव या संघाने पहिल्या सामन्यापासूनच उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात विबग्योर हायस्कुल, ऐरोली या मातब्बर संघाचा 4-0 गोलने पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात गोल्ड क्राईस्ट हायस्कुल, वाशी संघावर 3-0 ने मात दिली. पुढे उपांत्य फेरीत रिलायन्स फाऊंडेशन, स्कुल यांच्याशी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात महापालिकेच्या मुलींनी सुरेख ताळमेळ राखत सांघिक भावनेचे मैदानात प्रदर्शन करीत 1-0 ने विजय संपादन केला व अंतिम फेरीत मजल मारली. या स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणे आणि क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणे या मुलींच्या संघांमध्ये झाला. गेली दोन वर्षे सातत्याने विजेता होऊन मुंबई विभागात सुध्दा विजय संपादन केलेल्या क्राईस्ट अकॅडमी संघातील राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडू मुली आणि त्यांच्याकडील असलेला अनुभव या जोरावर क्राईस्ट अकॅडमीच्या संघाने अंतिम सामन्यात 5-0 गोलने सामना जिंकला व ते या गटाचे विजेते ठरले. तथापि चर्चा होत राहिली ती पहिल्यांदाच स्पर्धेत खेळूनही चार नामांकित शाळांचा पराभव करून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या नमुंमपा शाळा क्र. 36, कोपरखैरणे गांव संघाचीच.
या संघातील खेळाडू राबिया शेख, समृद्धी सोनावणे, ऋतुजा संकपाळ, किरण सूर्यवंशी, पूजा जाधव, प्रतीक्षा शिराळे, पूर्वा नवघणे, सोनाली कांबळे, सिद्धी लोहार, धनश्री महाजन, आचल ताजणे,तनुजा धुमाळ, श्वेता कंक , सेजल कंक, जगदेवी चिन्नाराठोड, करिश्मा चव्हाण, श्रावणी आगळे, समीक्षा रेणुसे, सरला झनकर यांचे सर्वांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. तसेच अंतिम विजयी ठरलेल्या क्राईस्ट अकॅडमी संघास विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai