एमआयडीसी प्रकल्पग्रस्त 62 वर्ष पुनर्वसनापासून वंचित!
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 29, 2023
- 510
1 ऑगस्टला आंदोलन करण्याचा एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचा इशारा
नवी मुंबई ः ठाणे-बेलापुर औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) संपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीचा योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप करण्यात आलेले नाही. गेली 62 वर्षे पुनर्वसनापासून वंचित राहिलेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने 1 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा शासनाला पत्राद्वारे दिला आहे.
ठाणे-बेलापुर औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) सन-1960 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टी परिसरातील शेतकऱ्याच्या शेत जमिनीचे संपादन केले. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आपल्या परिसरात एमआयडीसी आल्या नंतर आपल्याला रोजगार उपलब्ध होईल म्हणून त्यावेळी शेतकऱ्यांनी कोणताही विरोध न करता जमिनी दिल्या. त्यामुळे येथील शेतकरी 100 टक्के भूमीहीन झाला आहे. जमिन संपादन करताना ती 50 एकर असे किंवा 1 गुंठा मात्र त्याबदल्यात एमआयडीसीने, शेतकऱ्यांना केवळ 100 चौरस मीटरचे भुखंड वाटप केले आहेत. तसेच भूखंडाच्या किंमती पोटी 10 लाख रूपये शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. त्यावर लागणारे टॅक्स (कर) देखिल मोठया प्रमाणावर आकारणी करण्यात येत असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीने उद्योगधंद्यांसाठी संपादित केलेल्या जमिनीवर सध्या झोपडपट्टया, डेब्रिज आणि कमर्शिअल कॉम्लेक्स उभे राहिले आहेत. झोपडपट्टी धारकाचा जमिनीशी काही संबंध नसताना, झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकार घेते मग ‘एमआयडीसी' प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन का केले जात नाही? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. शिवाय ज्या मुळ कारणांसाठी जमिनी घेतल्या तो उद्देशच सफल न झाल्याने जमिनी मुळ मालक असलेल्या शेतकऱ्याला परत करा अशी मागणी जोर धरु लागली आहे. तसेच उदरनिर्वाच्या दृष्टीने म्हशीचे गोठे, शेतघरे होती त्यांचे पर्यायी भुखंड मिळावेत, तरुणांना रोजगार तसेच साफसफाई व इतर लहान मोठी कंत्राटी कामे देण्यात यावी, तांत्रिक, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर प्रशिक्षण देऊन नोकरी द्यावी, महिला व अपंग यांना स्वयंरोजगार देण्याची तरतूद करावी तसेच एमआयडीसी क्षेत्रातील महापे, पावणे, टेटवली, अडवली-भूतवली आणि इतर गावठाण विस्तार योजना लागू करा अश्या मागण्यासाठी एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने 1 ऑगस्ट रोज आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- ..नाहीतर तीव्र आंदोलन
वर्षानुवर्ष मागण्या मान्य न झाल्याने एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सदर मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे कळविले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai