मोदींच्या व्यस्ततेमुळे मेट्रोचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2023
- 546
नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई मेट्रोचे उद्धाटन होणार होते. मात्र त्यांच्या कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे लोकार्पणही पुन्हा लांबणीवर गेले आहे. उदघाटन झाले नाही म्हणून मेट्रो मार्चपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू होत नसल्याने नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांना वेळ नसेल तर सदर उदघाटन दिल्लीतून दृकश्राव्य प्रणालीने करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पांची मूहूर्तमेढ रोवली. नवी मुंबई मेट्रोचे काम गेली 12 वर्षे सुरु असून सिडकोला त्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावे लागले आहे. गेल्या मार्चपासून सिडकोच्या मेट्रोचे काम पूर्ण होऊनही उदघाटनासाठी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळत नसल्याने सहा महिने सदर मेट्रो प्रकल्प बंद आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मात्र सिडकोला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून 13 , 14 ऑक्टोबर व त्यानंतर 17 ऑक्टोबर अशा तीन वेळा लोकार्पणासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सिडकोकडून कोट्यवधी रुपयांची उदघाटनाची कामेही हाती घेण्यात आली होती. परंतु पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींच्या व्यस्ततेमुळे मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर होऊनही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोला लागलेले विलंबाचे ग्रहण सुटता सुटत नसल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईकरांनी दिली आहे. या अनावश्यक विलंबामुळे राज्य शासनासह सिडको व जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.
या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करण्याची विनंती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली असून लवकरात लवकर मेट्रोची सेवा नवी मुंबईकरांना बहाल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांना शिर्डीला यायला वेळ आहे परंतु जनतेसाठी महत्वाचे असलेल्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी वेळ नसल्याची खंत व्यक्त केली. पंतप्रधान दिल्लीत बसूनही दृक्श्राव्यद्वारे याचे लोकार्पण करू शकतात पण राज्य सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवायचे असल्याने हा पोरखेळ सुरु असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai