नवी मुंबईमध्ये राजीनाम्यांचा आपटी बार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 25, 2024
- 694
काँग्रेस, उबाठा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नवी मुंबई ः विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी तिकीट मिळावे यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र प्रत्यक्षात तिकीट न मिळाल्याने नाराज ईच्छुकांनी राजीनाम्यांचा आपटी बार फोडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिंदेसेनेचे विजय नाहटा, काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे तर उबाठाचे द्वारकानाथ भोईर या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.
नाहटा यांनी गेले सहा महिने बेलापूर मतदार संघाचा कोपरा पिंजून काढला होता. अनेक लोकपयोगी कार्यक्रम राबवले, तरीही उमेदवारी न मिळाल्याने नाईकांवर घराणेशाहीचा आरोप करत बेलापूर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यापुर्वी त्यांनी 2014 मध्ये नाईकांवर टक्केवारीचा आरोप करत बेलापुर मतदार संघातून निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता.
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे हे ऐरोली विधानसभा मतदार संघातून इच्छुक होते. त्यांनीही गेले वर्षभर ऐरोली मतदारसंघात आपली छाप पाडली होती. त्यांचे वडील रमाकांत म्हात्रे यांनीही 2014 साली काँग्रेसकडून या मतदार संघातून निवडणुक लढवली होती. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांनीही आपली नाराजी राजीनाम्यातून व्यक्त केली आहे. त्यांनी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यस्तवाचा राजीनामा दिलेला नाही.
उबाठा गटाने म.के.मढवी यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी जिल्हाप्रमुख पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असून उपऱ्यांना लाल गालिचा अथंरला जात असल्याने आपण बाहेर पडलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी राजीनाम्यानंतर दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai