शहर अभियंतापदी आरदवाड यांची नियुक्ती वादात
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2024
- 700
अभियांत्रिकी पदवी अभिलेखात नसल्याचा महानगरपालिकेचा खुलासा
नवी मुंबई ः शहर अभियंता संजय देसाई यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा पदभार अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे पालिका आयुक्तांनी दिला आहे. आरदवाड यांची नियुक्ती वादात सापडण्याची चिन्हे असून पालिका प्रशासनाने त्यांची अभियांत्रिकी पदवी पालिकेच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याचा खुलासा माहिती अधिकारात केला आहे. त्यामुळे उपायुक्त प्रशासन व पालिका आयुक्त या दोघांच्या भुमिकेवर या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
31 मे 2024 रोजी तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई यांच्या निवृत्तीपासून शहर अभियंता पदाचा कारभार अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांचेकडे प्रभारी म्हणून देण्यात आला आहे. शिरीष आरदवाड हे मेकॅनिकल अभियंता असल्याने त्यांच्याकडे हा पदभार देता येत नसतानाही पालिका उपायुक्त प्रशासन शरद पवार व पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून ही नियुक्ती केल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यामुळे या नियुक्तीनंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा ससेमिरा पालिका प्रशासनाच्या मागे लागला होता.
सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी याबाबत शिरिष आरदवाड यांची 1994 ची मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ची बी.ई.मॅकॅनिकल पदवीची मागणी माहिती अधिकारात केली होती. त्यांना उत्तर देताना शिरीष आरदवाड अतिरिक्त शहर अभियंता यांचे 1994 वर्षाच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची प्रत सामान्य प्रशासन विभागाच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे शिरीष आरदवाड शहर अभियंता किंवा अतिरिक्त शहर अभियंता पदाची अर्हता प्राप्त करत नसतानाही त्यांना नियुक्ती कशी दिली हा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. संतोष जाधव यांनी याबाबत राज्याचे मुख्यसचिव व नगरविकास प्रधान सचिव-2 यांचेकडे पुराव्यासह तक्रार केली असून यावर कारवाई न झाल्यास राज्याच्या लोकआयुक्तांकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये दाद मागण्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याबाबत पालिका उपायुक्त प्रशासन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाधव यांनी मागितलेल्या वर्षाची पदवी पालिकेत नसून आरदवाड यांची मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी 1996 साली दिलेली पदवी पालिकेच्या अभिलेखावर असल्याचे आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले. परंतु, अन्य मुद्यांबाबत अभिप्राय देण्यास नकार दिला.
- शासनाकडे मागणी
अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांची नियुक्ती वादात ठरल्यानंतर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी राज्य शासनाला पत्र देवून शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीने अधिक्षक दर्जाचा अधिकारी पाठवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिरीष आरदवाड यांची नियुक्ती लवकरच संपुष्टात येण्याची चर्चा सध्या महापालिकेत आहे. - ओएसडीसाठी धडपड?
पालिका आयुक्त शिंदे यांनी प्रतिनियुक्तीवर शहर अभियंता सरकारकडून मागवल्यामुळे आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल याची जाणिव आरदवाड यांना झाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर एखाद्या मंत्र्याचा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून आरदवाड यांनी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा सध्या मंत्रालयात रंगली आहे. त्यासाठी त्यांनी नवी मुंबईतील काही राजकर्त्यांना हाताशी धरले आहे. - राज्यातील सर्वात व्यस्त शहर अभियंता
आरदवाड यांनी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांना काय चॉकलेट दिले जेणेकरुन त्यांच्याकडे शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता, मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच विद्युत, यांत्रिकी, पर्यावरण व संगणक विभागाची कामे देण्यात आली आहेत. यापुव एवढे पदभार कोणत्याच शहर अभियंत्याकडे नव्हते. गेले सात महिने सर्व विभागाची कामे आरदवाड हिरीरीने पार पाडत आहेत. राज्यातील सर्वात व्यस्त शहर अभियंता म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले जात आहे. आरदवाडांवरच पालिका आयुक्तांनी कैलास पर्वता ऐवढी जोखिम कोणत्या अर्थपूर्ण हेतूने दिली याबाबत चर्चा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai