दस्त नोंदणी घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 26
नवी मुंबई ः गेल्या वर्षी जून महिन्यापासून चर्चेत असलेल्या नवी मुंबईतील दस्त नोंदणी घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाई टाळली जात असल्याची टीका होत होती. आता राज्याच्या मुख्य सचिवांनी दखल घेत महसूल विभागाच्या सचिवांकडे विचारणा केली. त्यानंतर गुरुवारी तातडीने नवी मुंबईतील तूर्भे पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रभारी सह-दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे, दस्त नोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन करून कमी मुद्रांक शुल्क आकारल्यामुळे सुमारे 13.99 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सरकारतर्फे या विभागाच्या वरिष्ठ लिपिकांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून बीएनएस कलम 318 (4), 3 (5) तसेच भारतीय नोंदणी अधिनियम कलम 18 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नवी मुंबईतील सह-दुय्यम निबंधक वर्ग-2, ठाणे/क्र. 8 या कार्यालयात घडल्याचे तपासात समोर आले आहे. या कार्यालयात तत्कालीन प्रभारी सह-दुय्यम निबंधक म्हणून राजकुमार दहिफळे कार्यरत होते. 19 सप्टेंबर 2024 ते 25 जुलै 2025 या कालावधीत नवी मुंबई परिसरातील गावठाण भागात सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर उभारलेल्या अनधिकृत इमारतींमधील सदनिकांची नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने कोकण विभागाचे नोंदणी उप-महानिरीक्षक यांनी सखोल चौकशी केली. या चौकशी अहवालानुसार दहिफळे यांनी भारतीय नोंदणी अधिनियमाच्या कलम 18 (1) (क) च्या तरतुदींचा भंग करून 842 दस्तांची बेकायदेशीर नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर झरेकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली. उपाध्यक्ष बनसोडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई व नाशिक विभागातील नोंदणी उप-महानिरीक्षकांनी संयुक्त चौकशी केली. या तपासात दहिफळे आणि त्यांच्या साथीदारांचे आणखी गैरप्रकार समोर आले. या संयुक्त चौकशीमध्ये एकूण 941 दस्तांची बेकायदेशीर नोंदणी झाल्याचे निष्पन्न झाले.
या नोंदणी प्रक्रियेत हेतुपुरस्सर कमी मुद्रांक शुल्क आकारल्यामुळे शासनाचा अंदाजे 13 कोटी 99 लाख 33 हजार 881 रुपयांचा महसूल बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai