चर्चासत्रात महिला धोरणांचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 27
नवी मुंबई ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागातर्फे चारही महिला धोरणांचा आढावा घेणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. या चर्चासत्रांची सुरुवात गुरुवार, 5 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील साहित्य मंदिर सभागृहात झाली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नवी मुंबई जिल्हा केंद्र, नवी मुंबई मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ तसेच नवी मुंबई स्वयंसेवी संघटना समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई साहित्य, कला आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी होते. यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिला लोकप्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे गाव चालवण्याची जबाबदारी महिलांवर सोपवली जाणे, हा महिला धोरणांमुळे झालेला एक महत्त्वपूर्ण बदल आहे. काही वर्षांपूर्वी महिला उमेदवार शोधणे कठीण होते, परंतु आता राजकारणात महिलांची स्पर्धा वाढली आहे. मात्र, त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात यू-टर्न घेत असल्याचेही दिसून येते. बजेट तयार करतानाही महिलांना अद्याप पुरेसे सामावून घेतले जात नाही, असे मत रिसोर्स अँड सपोर्ट सेंटरचे संचालक भीम रास्कर यांनी धोरण कुठंवर आलं गं बाई! या चर्चासत्रात व्यक्त केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हसिना खान, स्त्री मुक्ती संघटनेच्या पदाधिकारी वृषाली मगदूम आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटरचे संचालक भीम रास्कर या वक्त्यांनी महिला धोरणांतील काही तरतुदींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. या आव्हानांवर मात करून तळागाळातील महिलांपर्यंत धोरणे यशस्वीपणे कशी राबवता येतील, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
भीम रास्कर यांनी आपल्या मांडणीत सांगितले की, राजकीय पक्षांमध्ये महिला प्रवक्त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत महिला धोरणेही आखली पाहिजेत. पॉश कायदाही राजकीय पक्षांना लागू करावा. ज्योतिबापुत्र अभियान राबवल्यास पुरुषांकडून समर्थन प्रणाली तयार होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हसिना खान यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “धोरण सर्व महिलांसाठी आहे, तरीही अंमलबजावणीत मुस्लिम समुदायातील महिलांकडे दुर्लक्ष केले जाते. मुख्य प्रवाहातील शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये त्यांच्याकडेही दुर्लक्ष होते.” स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी चारही धोरणांमधील शिक्षण, आरोग्य, हिंसा आणि लिंगसमता या मुद्द्यांवर धोरणातील उत्तम मसुदा, त्याची अंमलबजावणी आणि त्यातील कमतरता यांची मांडणी केली. पहिल्या महिला धोरणाला 32 वर्षे उलटली तरी कष्टकरी महिलांपर्यंत ते पोहोचलेले नाही, अशी खंत मगदूम यांनी व्यक्त केली. 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा आला, तरी 2026 मध्येही कौटुंबिक हिंसा आणि हुंडाबळी सुरूच आहेत. सरकारबरोबरच सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनीही धोरण राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामाजिक बदल होईपर्यंत धोरणांची शंभर टक्के अंमलबजावणी शक्य नाही, असेही मगदूम यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महिला विभागप्रमुख साधना तिप्पनाकजे यांनी केले तर यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले. या चर्चासत्राला चव्हाण सेंटरच्या नवी मुंबई केंद्राचे पदाधिकारी, यशस्विनी नवी मुंबई समन्वयक मनिषा देसाई आणि नवी मुंबईतील शंभरच्या वर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai