गॅसच्या दरवाढीविरोधात ‘महागाईची तिरडी’
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 23
पनवेल ः आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप करत पनवेलमध्ये काँग्रेस पक्षाने गुरुवारी महागाईविरोधात जोरदार आंदोलन छेडले. स्वयंपाक गॅसच्या दरवाढीबरोबरच काही भागांत सिलेंडर टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत पनवेल प्रांत कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ‘महागाईची तिरडी’ काढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
पनवेल शहरातील अनेक भागांमध्ये महानगर गॅसच्या पाइपलाइनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा होत असला तरी शहरातील सुमारे 40 टक्क्यांहून अधिक परिसर अद्यापही स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. या भागांत गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सिलेंडरसाठी ग्राहकांना गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असून तीन-चार दिवस हेलपाटे मारूनही गॅस मिळत नसल्याने काळ्या बाजारात सिलेंडर विक्री होत असल्याची तक्रार काही गॅसधारकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पनवेल जिल्हा शहर समितीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पायी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर प्रतिकात्मक तिरडी काढून गॅस सिलेंडरसमोर अश्रू ढाळत सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात काँग्रेसचे विविध महिला-पुरुष पदाधिकारी तसेच पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या तोंडरे, घोट, देवीचापाडा आदी सात गावांतील कंत्राटी कामगार गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरअभावी अडचणीत सापडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मात्र पनवेल तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाच्या अधिकारी अश्विनी धनवे यांनी दिले. शासनाच्या निर्देशांनुसार व्यावसायिक गॅस वितरण बंद असल्याने त्याची विक्री होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, कंत्राटी कामगारांच्या अडचणींची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी कष्टकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai