दोन लाख करदाते थकबाकीदार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 28
23 दिवसांत 1623 नोटिसा; 123 मालमत्तांची अटकावणी
पनवेल ः मालमत्ता कर वसुलीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पनवेल महापालिकेने थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या 23 दिवसांत 1623 करदात्यांना नोटिसा बजावत 123 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली असून, यामुळे कर वसुलीला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पनवेल महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेल्या मालमत्ता कर वसुलीत अद्यापही समाधानकारक प्रगती झालेली नाही. कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने महापालिकेने मार्च अखेरीस कडक पावले उचलत अटकावणीची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत गेल्या 23 दिवसांत 1623 करदात्यांना अटकावणीपूर्व नोटिसा देण्यात आल्या, तर 123 मालमत्तांवर थेट कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 51 अटकावणी या कळंबोली उपनगरातील आहेत. गेल्या 24 दिवसात महापालिकेच्या तिजोरीत 16 कोटी रूपयांचा मालमत्ता कर नागरिकांनी जमा केला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या नऊ वर्षांत एकूण 3,69,531 मालमत्ताधारकांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ 1,69,163 जणांनीच मालमत्ता कर भरला आहे.
कर भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या 90 टक्के शास्तीमाफीच्या अभय योजनेमुळे काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला, तरी अजूनही सुमारे दोन लाख करदाते थकबाकीदार आहेत. तळोजा, खारघर, कामोठे आणि कळंबोली या उपनगरांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेसमोर तब्बल 1746 कोटी रुपयांची कर वसुली करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. ही रक्कम मिळाल्यानंतरच शहर विकासाची विविध कामे हाती घेणे शक्य होणार आहे, अन्यथा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी 12 वसुलीसाठी पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात सेवानिवृत्त अधिकारी, लिपिक, कॅमेरामन आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश असून, ही पथके दररोज सुमारे 10 मालमत्तांना भेट देऊन अटकावणीची कारवाई करीत आहेत.दरम्यान, अटकावणीची कारवाई सुरू होताच काही व्यापारी थकबाकीपैकी निम्मा कर भरण्यास पुढे येत असल्याची माहिती कर विभागाचे अधीक्षक महेश गायकवाड यांनी दिली. त्यामुळे या मोहिमेमुळे कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai