विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपांनी गाजली महासभा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 20
नालेसफाई, पाणीटंचाई, भुखंड भाडेपट्टा करारासह विविध विषयांवर चर्चा
पनवेल ः पनवेल महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण महासभा बुधवारी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा आणि निर्णयांसह पार पडली. या महासभेत शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, तर अनेक प्रस्तावांना मंजुरी देत आगामी कामकाजाचा मार्गही मोकळा करण्यात आला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेतील पहिला सर्वाधिक चर्चेचा विषय परेश ठाकूर यांची स्थायी समितीमध्ये प्रवेश हा ठरला. ठाकूर यांच्या स्थायी समितीत प्रवेशामुळे यापुढे ठाकूर कुटुंबीयांचा प्रभाव पनवेल महापालिकेच्या प्रत्येक निर्णयात असेल. सभेत स्थायी समिती सदस्य प्रवीण पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्तीस मंजूरी देण्यात आली. पुढील 10 ते 15 दिवसात पनवेलमध्ये पाणी परिषद घेतली जाणार असल्याचे जाहीर केले. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी नियुक्तीस मान्यता देण्यात आली. डायलिसिस केंद्रांसाठी प्राणवायू गॅस पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. स्वच्छता व नागरी सुविधांमध्ये प्रभाग ‘ड’मधील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती व नूतनीकरणास मान्यता देण्यात आली.
या महासभेत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक या शैक्षणिक संस्थेला पनवेल शहराच्या मध्यवत भागातील सुमारे पाच हजार चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांच्या भाडेपट्टे करारावर देण्याच्या प्रस्तावावरून जोरदार राजकीय खळबळ उडाली. महासभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटाकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. भूखंड देण्याच्या अटी, भाडेपट्टा दर आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती याबाबत अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी भाडेपट्ट्यावर महापालिकेचा भूखंड देताना राबविण्यात आलेली प्रक्रिया योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसचे सदस्य हरेश केणी यांनी सुद्धा 4,800 कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या महापालिका स्वता या भूखंडावर का शाळा बांधत नाही याकडे लक्ष्य वेधले. तसेच उबाठाच्या गटनेत्या लीना गरड यांनी प्रस्तावाला थेट विरोध दर्शवित संबंधित भूखंड हा सूमारे दिडशे कोटी रुपयांचा असल्याची माहिती सभागृहात मांडली. तर शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांनी तांत्रिक बाबींवर मुद्दा उपस्थित केला. रामदास शेवाळे यांनी अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी कोणती तरतूद केली जाणार याची विचारणा केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत, ठाकूर यांच्या शैक्षणिक संस्थेला भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यासाठी सभागृहातून विरोध होत असेल तर भूखंड देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. उलट महापालिकेने स्वतःच्या जागेवर शाळा उभारावी आणि त्या शाळेला रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांचे योगदान देण्याची तयारी पालिका सदस्य परेश ठाकूर यांनी दर्शविल्याची घोषणा त्यांनी केली. या सुधारीत प्रस्तावाला सभागृहात पुन्हा मांडण्याची मागणीही करण्यात आली. महापौर नितीन पाटील यांनी प्रशासनाला सुधारीत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. या नव्या घडामोडींमुळे आता महापालिका स्वतःची शैक्षणिक सुविधा या भूखंडावर उभारण्याचा पर्याय निवडेल का याकडे सर्वसामान्य पनवेलकरांचे लक्ष्य लागले आहे.
नालेसफाईच्या कंत्राटावरुनही खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. नालेसफाई एका वर्षाची करायची असताना एकाच वेळी दोन वर्षांच्या नालेसफाची निविदा प्रक्रिया का राबवली जाते अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार नगरसेवकांनी केला. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी निविदा प्रक्रिया आणि पावसाळ्याच्या तोंडरर घाईघाईत होणाऱ्या नालेसफाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
- पाण्यासाठी आंदोलन
बुधवारी पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महासभा सुरू होण्यापूव पाणीटंचाईच्या प्रश्नावरून नागरिकांचा संताप उफाळून आला असून, रिकामे हंडे आणि बादल्या घेऊन व्याकुळलेल्या महिलांनी थेट महासभेच्या प्रवेशद्वारावर धडक दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेल्या हालअपेष्टांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली व्यथा मांडली. नावडे व तळोजा परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रश्नोत्तरांच्या तासात शहरातील चारही प्रभागांतील पाणीटंचाईवर चर्चा झाली. न्हावा-शेवा पाणी योजनेसह अतिरिक्त टँकरची गरज यावर आयुक्त मंगेश चितळे यांनी माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai