माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील आणि अचूक वार्तांकन करावे
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 22, 2026
- 32
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर
मुंबई : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित “महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता, लेखिका रिचा सूद आदी उपस्थित होते. महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने कायम आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते, असे रहाटकर यांनी नमूद केले.
डिजिटल युगात बातम्यांचा वेग प्रचंड वाढला असला, तरी पडताळणीशिवाय माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढला आहे. “बातमी लवकर देणे महत्त्वाचे असले तरी तिची विश्वासार्हता त्याहून अधिक महत्त्वाची आहे,” असे त्या म्हणाल्या. फेक न्यूज आणि दिशाभूल रोखण्यासाठी तथ्य-तपासणीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांविरोधातील गुन्ह्यांचे वार्तांकन करताना सुयोग्य भाषेचा वापर करत पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावे, असे आवाहन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. लिंग-संवेदनशील वृत्तांकन हा पर्याय नसून प्रत्येक पत्रकाराची व्यावसायिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांशी संबंधित कायद्यांची अचूक माहिती पत्रकारांना असणे गरजेचे असून त्यामुळे वृत्तांकन अधिक तथ्याधारित आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य राहते, असेही त्या म्हणाल्या. माध्यमांनी महिलांचे प्रश्न केवळ गुन्हेगारी घटनांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मीडिया ट्रायल टाळणे, न्यायप्रक्रियेचा सन्मान राखणे आणि वंचित व तळागाळातील महिलांच्या आवाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही माध्यमांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे नमूद करत त्यांनी पीडितेची ओळख प्रकट न करणे, महिला तज्ज्ञांना संधी देणे आणि पॉश कायदा तसेच महिला तस्करीसारख्या विषयांवर सातत्याने प्रकाश टाकणे या बाबींचे स्वागत केले. महिलांच्या यशकथा, संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास यांना अधिक प्रसिद्धी देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी सांगितले की अशा कथा समाजात सकारात्मक बदल घडवतात आणि नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करतात. राष्ट्रीय महिला आयोग माध्यमांना सामाजिक परिवर्तनाचे भागीदार मानत असून, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून व्यापक बदल घडवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संचालक गोविंद अहंकारी यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून समाजजागृती करणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे सांगितले. या कार्यशाळेला मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला अत्याचार घटनांच्याबाबत वार्तांकन करताना संवेदनशीलता व जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. संपूर्ण वार्तांकनामध्ये पिडीतेच्या नावाच्या गुप्ततेबाबत खबरदारी बाळगावी लागते. अशा घटनांच्या वार्तांकनामध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्य ठरणारे वार्तांकन असावे, अशी अपेक्षा लेखिका डॉ रिचा सूद यांनी व्यक्त केली. तर माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या शब्दांमधून समाजाची मानसिकता घडते. त्यामुळे पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी केले. सध्या अस्तित्वात असलेले महिलांविषयीचे कायदे, त्यांच्यासाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती महिलांना होणे आवश्यक आहे. त्याकरिता माध्यमांनी महिलांविषयी कायदे, योजना, उपक्रमाच्या वार्तांकनावर भर द्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai