उष्णता, इंधन दरवाढीचा भाजीपाल्याला फटका
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2026
- 22
20 ते 40 टक्के दरवाढ; उन्हामुळे माल दर्जाहीन
नवी मुंबई : वाढतीउष्णाता, वाढते इंधन दर आणि मालवाहतूक भाड्यात झालेली वाढ यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा तुडवडा भासत असून किमती वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायावर मोठा ताण निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, जुन्नर या भागांतून मुंबई एपीएमसीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. मात्र वाढत्या इंधनदरामुळे वाहतूक खर्च वाढल्याने वाहतुकदारांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मालवाहतूक भाड्यात सुमारे 10 टक्के वाढ करण्यात आली असून त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरवाढीवर झाला आहे.
वाहतूक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज थोड्या-थोड्या प्रमाणात इंधन दरवाढ होत असल्याने मालवाहतुकीचे नियोजन करणे कठीण होत आहे. सतत बदलणाऱ्या इंधनदरामुळे वाहतूक खर्चाचा अचूक अंदाज बांधणे अवघड होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंधन दरवाढीसोबतच चालकांची कमतरता भासत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. अनेक चालक सुट्टीवर असल्याने उपलब्ध वाहनांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच वाढत्या खर्चाच्या तुलनेत विद्यमान भाडेदर परवडत नसल्याने भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे वाहतूकदारांनी स्पष्ट केले. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याच्या दर्जावरही परिणाम होत आहे. राज्याबाहेरून तसेच ग्रामीण भागांतून येणारा भाजीपाला वाहतुकीदरम्यान खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राबाहेरून बाजारात पोहोचणाऱ्या मालातील मोठा हिस्सा सडलेला किंवा दर्जाहीन अवस्थेत असल्याने विक्रीयोग्य शेतमालाचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी उपलब्ध भाजीपाल्याला अधिक दर मिळत आहेत.
एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार टोमॅटो, भेंडी, वांगी, हिरवी मिरची, मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, गवार आणि फरसबी दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील ही वाढ किरकोळ बाजारात अधिक तीव्रतेने जाणवत असून ग्राहकांना रोजच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता येत्या महिनाभरात तरी भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. इंधनदरवाढ, वाहतूक खर्च आणि उष्णतेचा परिणाम यामुळे भाजीपाला बाजारातील महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai