शहर ‘रिसायकल हब’ बनविण्यासाठी पालिकेची पावले
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 21
पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार
नवी मुंबई ः शहरी भागातील पर्यावरण विषयक प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी मूर्तींच्या पुनर्वापरावर शाश्वत उपायोजना करण्याच्या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्था, संशोधक यांच्यासोबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्यामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची मांडणी करण्यात आली. ज्यामध्ये पीओपी पुनर्प्राप्तीचा प्रायोगिक प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली, त्याचप्रमाणे लहान प्रमाणात कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान तसेच विकेंद्रित कचरा व्यवस्थापन मॉडेल यांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली.
आयसीटी मार्फत नवी मुंबईत पुनर्वापर प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. याविषयी व्यवहार्यता तपासली जाईल असे पालिकेमार्फत सांगण्यात आले. मूर्तीकार संघटनेच्या प्रतिनिधींनी या पुनर्वापरात येणाऱ्या पीओपीचा वापर नव्या मूर्ती बनविण्यासाठी सहमती दर्शविली. नुओटेरा संस्थेमार्फत पीओपी मूर्तींचा पुनर्वापर करुन शालेय फर्निचर, जसे की अभ्यासाचे टेबल बनविण्याचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करण्यात आले. ज्याव्दारे विसर्जित मूर्ती पुनर्वापरासाठी सुपूर्द करण्याकरिता सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव संस्थेमार्फत मांडण्यात आला. प्रोजेक्ट मुंबई संस्थेमार्फत पर्यावरण विषयक उपक्रमांमध्ये सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नागरी स्वयंसेवक पोर्टल’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासोबतच त्यांनी नवी मुंबई शहराला सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक बनविण्यासाठी नागरिक सहभागावर भर देणारे ‘अग्नि सुरक्षा व्हिजन’ सादर केले. याव्दारे नागरिकांच्या सहभागातून शहरासाठी स्वयंस्फुर्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा समुह निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली. महाराष्ट्र हवामान सप्ताह 2027 कालावधीत शहरी जैवविविधतेच्या वैज्ञानिक व्यवस्थापनेच्या आधारावर महाराष्ट्राला जैवविविधतेमध्ये अग्रणी स्थान देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या योगदानाविषयी चर्चा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या वृक्ष गणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रात 225 हून अधिक जागांमध्ये 15 लाखाहून अधिक झाडे असल्याचे निदर्शनास आले असून शहराचे पर्यावरणीय मूल्य वाढविण्यासाठी देशी वृक्षारोपणावर भर देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्थानिक पर्यावरण व्यवस्थापन आणि वर्तणुकीतील बदलांसाठी ‘सिव्हिक मार्शल’चे महत्वही अधोरेखीत करण्यात आले.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या इको क्रांती या उपक्रमांतर्गत एकल वापराच्या प्लास्टिकला जैवविघटनशील उत्पादनांचे विविध पर्याय मांडण्यात आले. त्यांचा उपयोग प्रामुख्याने रेस्टॉरंट व रुग्णालयांमध्ये वाढविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रेसपल इंडिया मार्फत उद्याने व शेतीतील कचऱ्यापासून बनविलेल्या बायोमास ब्रिकेट्सचा उपयोग अंत्यविधीसाठी करुन अंत्यविधीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांच्या बचतीच्या अनोख्या उपक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नव्याने लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 मधील प्रमुख तरतूदींवर भाष्य करीत दररोज 100 किलोपेक्षा अधिक मोठया प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, सोसायट्या यांच्या यापुढील काळातील जबाबदाऱ्या आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राबवयाची यंत्रणा यावर विशेष लक्ष देण्याची गरज विशद केली. त्याचप्रमाणे श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक नियमानुसार विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी जीपीएस टॅगींगव्दारे मूर्तींची ट्रेसिबीलिटी असण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पीओपी मूर्तींच्या सुयोग्य व्यवस्थापनेसाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाची गरज विशद करीत या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींनी या कामी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी या प्रसंगी केले.
रोटरी क्लब पदाधिकारी यांनी पालिकेच्या पर्यावरणशील उपक्रमांची प्रशंसा करीत वृक्ष संवर्धनासाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याची संमती दर्शवली. केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समितीमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने देशात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राचे माहितीपूर्ण सादरीकरणही यावेळी करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी सर्व संबधित संस्था आणि संशोधकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यावहारिक व विस्तारित रुप देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. या बैठकीच्या माध्यमातून नवी मुंबई शहर ‘रिसायकल हब’ होण्याच्या दृष्टीने यशस्वी पाऊल टाकण्यात आलेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai