महावितरण कार्यालयावर हल्लाबोल
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 20
वाढत्या वीज समस्यांवरून शिवसेना आणि युवासेनेचे आंदोलन
नवी मुंबई : ऐरोली, घणसोली आणि नेरूळ परिसरातील वाढत्या वीज समस्यांवरून शिवसेना (शिंदे) आणि युवासेनेने वाशी येथील महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांकडून वेळेवर साहित्य आणि प्रतिसाद मिळत नसल्याची बाब मांडल्यानंतर म्हस्के यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
घणसोली, ऐरोली, नेरूळ आणि परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार वीज जाणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, केबल बिघाड आणि ट्रान्सफॉर्मरवरील वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर या समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युवासेनेच्या वतीने यापूर्वी 6 मे रोजी महावितरण प्रशासनाला निवेदन देऊन या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत काही भागांतील बिघाड दुरुस्त करण्यात ठेकेदारांकडून वेळेवर साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळा केबल आणि अन्य साहित्य उपलब्ध नसल्याने दुरुस्तीची कामे रखडत असल्याची माहितीही देण्यात आली.
यावर संतप्त होत म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांना रोज त्रास होत असताना प्रशासनाने केवळ कारणे सांगून चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ठेकेदार काम करत नसतील, प्रतिसाद देत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार ऐकत नसतील, साहित्य देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा थेट सवाल करत नवी मुंबईचे खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेतानाच समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचे त्यांनी सुनावले.
दरम्यान, महावितरणचे शहर अभियंता संजय पाटील आणि अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने देण्यात आला. पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेल्या या वीज समस्यांमुळे नवी मुंबईतील नागरिकांचा संयम सुटत चालल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai