मान्सूनसाठी कोकण रेल्वेची जय्यत तयारी
- by मोना माळी-सणस
- Jun 17, 2026
- 22
नवी मुंबई ः कोकणातील मान्सून हा निसर्गसौंदर्याचा अद्भुत अनुभव देणारा असला, तरी मुसळधार पाऊस आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मान्सून 2026 साठी व्यापक तयारी पूर्ण केली असून प्रवाशांची सुरक्षितता आणि अखंड रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत.
कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, अत्याधुनिक देखरेख प्रणाली, विशेष गस्त व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यावर्षीचा मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू राहणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध मार्गांवर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहेत. ओळखळलेल्या ठिकाणी उतार सपाट करणे, माती स्थिरीकरणासाठी ‘सॉईल नेलिंग’, बोगदे आणि कटिंग भागांमध्ये ‘रॉक बोल्टिंग’ व ‘शॉटक्रीटिंग’ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच गॅबियन भिंती, रिटेनिंग वॉल, मायक्रोपाईल्स आणि बोल्डर नेटिंग बसवून भूस्खलन व दगड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला आहे. नाले आणि पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांची स्वच्छता व काँक्रीट अस्तरीकरण करण्यात आले असून संवेदनशील ठिकाणी पोर्टेबल डी-वॉटरिंग पंप तैनात करण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दशकात मान्सूनदरम्यान दगड कोसळल्यामुळे कोणताही मोठा रेल्वे व्यत्यय आलेला नाही. मान्सून काळात 657 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची 24 तास गस्तीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे वॅगनवर आधारित उत्खनन यंत्र, रेल्वे देखभाल वाहने, टॉवर वॅगनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी विशेष नियमकमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लोको पायलटना रेल्वेचा वेग ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे रुळांवर पाण्याची पातळी 100 मिमीपेक्षा जास्त झाल्यास रेल्वे सेवा तात्पुरती थांबवली जाईल आणि पाणी ओसरल्यानंतरच पुन्हा सुरू केली जाईल. रत्नागिरी आणि वेरणा येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अपघात निवारण वैद्यकीय वाहने उपलब्ध आहेत. वेरणा येथे अपघात निवारण रेल्वे 15 मिनिटांत रवाना होण्यास सज्ज ठेवण्यात आली आहे. नद्यांवरील महत्त्वाच्या पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच पनवळ व्हायाडक्ट, मांडवी पूल, झुआरी पूल आणि शरावती पूल येथे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर बसविण्यात आले आहेत.
- 24 तास नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय सेवा
बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व 72 स्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणांवर सतत नजर ठेवली जाणार आहे.भारतीय हवामान विभागाकडून दररोज हवामानाचा अंदाज घेतला जात असून त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवासी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा 139 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून रेल्वेची अद्ययावत माहिती मिळवू शकतात.कोकण रेल्वेने मान्सून हंगामातील सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण केली असून सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड रेल्वे सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस