प्राणी-मनुष्य संघर्ष निवारणासाठी उपाययोजना
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 22
पनवेल महापालिकेच्या ॲनिमल वेलफेअर समितीची बैठक संपन्न
पनवेल ः महानगरपालिका स्तरावर गठित करण्यात आलेल्या ॲनिमल वेलफेअर कमिटी (प्राणी कल्याण समिती)ची बैठक बुधवारी (दि. 24 जून 2026) मा. आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. प्राणी संगोपनकर्ता आणि इतर रहिवाशी यांच्यातील संघर्षाचा सामना करताना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ॲनिमल वेलफेअर समितीची स्थापना करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्राणी व मनुष्य यांच्या मधील संघर्ष तसेच फिडींग स्पॉट बद्दल उद्भवणाऱ्या तक्रारी या सर्वबाबींवर चर्चा करण्याकरिता ॲनिमल वेलफेअर समितीची पालिका स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, पशुधन विकास अधिकारी डॉ.मुकेश मर्चंटे, आयडीए एनजीओचे डॉ. अमेय तांडेल, निरीक्षक कल्पेश कदम, खांदेश्वर पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता ढाकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तळोजा निलम पवार, पनवेल पोलिस स्थानकाच्या के.बी म्हात्रे, उपस्थित होत्या. या बैठकीत सर्वोच्च न्यायालय तसेच ॲनीमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (एडब्लूबीआय)ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. विशेषतः प्राणी जन्म नियंत्रण नियमन 2023 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील भटक्या श्वानांचे पकडणे, निर्बिजीकरण, लसीकरण आणि आवश्यक उपचारांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकी मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम विषयक माहिती देण्यात आली. प्राणी संगोपनकर्ते आणि इतर रहिवासी यांच्यात उद्भवणारे संघर्ष, तसेच फीडिंग स्पॉटसंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पनवेल महानगरपालिकेचे प्राणी जन्म नियंत्रण केंद्र पोदी, नवी पनवेल येथे कार्यरत असून, बाह्य यंत्रणेमार्फत 2018 पासून श्वान निर्बिजीकरण व लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. तसेच जून 2023 पासून मांजरांचे निर्बिजीकरण व लसीकरणही सुरू करण्यात आले आहे.
- ‘झिरो रेबीज निर्मूलन’ कार्यक्रम
‘झिरो रेबीज निर्मूलन’ कार्यक्रमांतर्गत 2025 मध्ये 15हजार 689 भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले होते. तर 2026 मध्ये उपायुक्त प्रसेनजित कारलेकर व मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 16 हजार 851 श्वानांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. - तक्रार निवारण यंत्रणा
- संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी महापालिका स्वतंत्र यंत्रणा राबवित आहे. नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक 9320056589 उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारींची नोंद या ऑनलाइन प्रणालीवर करावी, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले.
- दोन पशुवैद्यकीय फिरते दवाखाने
प्राण्यांना प्राथमिक उपचार देण्यासाठी महापालिकेमार्फत दोन पशुवैद्यकीय फिरते दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेवेद्वारे प्राण्यांची आरोग्य तपासणी, प्राथमिक औषधोपचार, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, जंतनिर्मूलन तसेच वैद्यकीय सल्ला दिला जात आहे. - फीडिंग स्पॉट
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, अधिकृत फीडिंग स्पॉट निश्चित करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासणीनंतर काही फीडिंग स्पॉट निश्चितही करण्यात आले आहेत. याशिवाय आक्रमक व रेबीज संशयित श्वानांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे तळोजे येथे हे केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. बैठकीत प्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्षासंदर्भातील तक्रारींचे निवारण करताना पोलीस प्रशासनास येणाऱ्या अडचणी, सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडील निर्देश आणि प्राणी जीवजंतु कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai