वांगचुक उपोषणावर ठाम; दिल्लीत होणार चक्काजाम
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 28
20 जुलैला ‘चलो संसद’ मोर्चातसहभागाचे आवाहन; अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवरसुरक्षा कडक
दिल्ली : नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी अनिश्चितकालीन उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष केल्याने देशभर असंतोषाची लाट पसरली आहे. वांगचुक यांनी शांततापुर्ण मोर्चाची तयारी केली असून 20 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे उपोषणावर आहेत. त्यांचे वजन जवळपास 9 किलोने कमी झाले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय पथकाने त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचा इशारा दिला असून, अवयवांवर परिणाम होण्याचा धोका वाढल्याचे सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. “प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे,‘अशी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली. वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सरकारी डॉक्टरांनी वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करावी आणि त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आदेश दिले आहेत. यावर केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयाला आश्वस्त करण्यात आले की, वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.
अवघ्या 18 दिवसांत त्यांचे वजन 8.9 किलोने घटून आता 57.15 किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी सुरू असलेल्या उपोषणाचा त्यांच्या अंतर्गत अवयवांवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे. ‘मी सुरू केलेलं काम त्याच्या शेवटापर्यंत नेणार आहे,’ असं ते वांगचुक म्हणाले. येत्या 20 जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या मंदिरात आपण आपले विचार मांडू, असे ते म्हणाले.
दरम्यान, वांगचुक यांनी 20 जुलैपर्यंत सरकारने चर्चेसाठी पुढे यावे, अशी भूमिका मांडली आहे. ठोस प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतरमंतर येथे जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांचा मुद्दा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 जुलैपासून संसद अधिवेशन सुरु होणार असल्याने सरकारची पुढील भूमिका काय असेल आणि आंदोलनाबाबत कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.
- महाराष्ट्रातून पाठिंबा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. महापराष्ट्रातून मनसे, उबाठा, राष्ट्रवादी श.प. यांनी आंदोलनाचे समर्थन केले आहे. सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली. या ऐतिहासिक लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी 19 जुलै रोजी दुपारी 4:00 वाजता शिवतीर्थावर एकत्र येण्याचे खुले आवाहन केले आहे. - 20 जुलैला तणावाची शक्यता
20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच दिवशी सोनम वांगचुक यांनी चलो संसद या शांततापूर्ण मोर्चाचे आवाहन केले आहे. वांगचुक यांच्या समर्थनार्थ देशभरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध गट दिल्लीकडे रवाना होत असून, शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. 20 जुलै रोजी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान वाढण्याची शक्यता असून, प्रशासनानेही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची तयारी केली आहे. - राहुल गांधींवर नाराजी
वांगचुक यांच्या आंदोलनाला तीन आठवडे उलटले तरी राहुल गांधी यांनी कोणतेही भाष्य यावर केले नाही तसेच आंदोलकांची भेट घेण्याचे स्वारस्य दाखवले नाही. उपोषणाचा 20 वा दिवस असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांनी उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक तसेच विद्यार्थी नेते नेहा, मनीष आणि आमीन यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. मात्र राहुल गांधींकडे काँक्रोज पाटीसह समस्त तरुणवर्ग आशेने पाहत असताना त्यांनी स्वतः येणे टाळल्याने त्यांच्याविषयी नाराजी पसरली आहे.
- विरोधकांना सामिल होण्याची साद
सोनम वांगचुक यांनी जाहीर केले की, लोकशाहीत लोकांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे आणि याच उद्देशाने ते संसदेकडे आगेकूच करतील. हा मोर्चा कोणत्याही राजकीय संघर्षासाठी नसून देशाच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडवण्यासाठीचा लोकशाही मार्ग आहे.32 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतरही सरकारला जाग येत नसले तर त्यांची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपले मन मोठे करुन या लढाईत सहभागी व्हावे अशी साद त्यांनी देशभरातील विरोधीपक्षांना घातली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai