मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 21
पनवेल ः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरातील चारही प्रभागांमध्ये दि.23 जुलै रोजी मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबीराचे प्रातिनिधीक उद्घाटन उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे महापौर नितीन पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, शेकापचे गटनेते केतन भगत, महापालिका सदस्य प्रकाश म्हात्रे, उपायुक्त अभिषेक पराडकर , मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक शिवाजी पाटील आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना महापौर नितीन पाटील म्हणाले आजकाल धकाधकीच्या वातावरणात विविध आरोग्य समस्या नागरिकांना भेडसावत असतात, अशावेळी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकिय आरोग्य विभागाचा स्टाफ अत्यंत तन्मयतेने सेवा देत असतो. शासनातर्फे आलेल्या सर्व आरोग्य विषयक योजना पनवेलकरांना देण्यासाठी मनपा अग्रेसर असते. याचे सर्व श्रेय महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास जाते.
विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे म्हणाले, पनवेल महापालिका मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स तसेच ग्राऊंड लेव्हलला काम करणाऱ्या आशा सेविका आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी कष्ट घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल येथे आयोजित शिबिरांमध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारच्या मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, तसेच आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. याशिवाय रक्त तपासणी अंतर्गत मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही किट, क्षयरोग व हिमोग्लोबिन आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शनही देण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रास्तािविकामध्ये मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी जनआरोग्य शिबिरांचे आयोजनामागील हेतू व माहिती दिली. तसेच नागरिकांनी आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढण्याविषयी आवाहन केले.
याशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. सुरेश पंडित, डॉ. मनिषा चांडक, डॉ.भक्तराज भोईटे यांनी मेहनत घेतली . तसेच या शिबिरांमध्ये एमजीएम हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल आणि लाइफलाइन हॉस्पिटल येथील विद्यार्थी डॉक्टरांनीही सक्रिय सहभाग घेत नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन केले. पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आयोजित या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह आवश्यक आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai