4,500 गुंतवणूकदारांची तब्बल 47 कोटींची फसवणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 22
ऑसम स्वदेश एलएलपी प्रकरणात सीएमडीसह दोघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
नवी मुंबई : दरमहा आकर्षक परतावा, भरघोस कमिशन आणि डायमंड गिफ्टचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची तब्बल 47 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या ऑसम स्वदेश एलएलपी या कंपनीविरुद्ध नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कंपनीचे सीएमडी सुनील पालवे आणि एजंट नवनाथ रेपोळे यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला विशेष कारवाईचे आदेश देण्यात आले होते. एफआययू युनिटला प्राप्त झालेल्या निनावी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ऑसम स्वदेश एलएलपी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि एजंटांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. कंपनीने गुंतवणुकीवर दरमहा आकर्षक परतावा, कमिशन तसेच डायमंड गिफ्ट देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधी स्वीकारल्यानंतर परतावा देणे अचानक बंद करण्यात आले. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 375/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316(5), 318(4), 3(5) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, 2019 मधील कलम 3, 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कंपनीचे सीएमडी सुनील पालवे, मार्केटिंग डायरेक्टर जयदेव गंभे, आशीष बर्वे, अमोल जाधव, एजंट नवनाथ रेपोळे, दिनेश कोळंबे तसेच कंपनीचे इतर प्रतिनिधी आणि एजंट यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात सुमारे 4,500 गुंतवणूकदारांकडून 47 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचे समोर आले असून, त्यातील मोठ्या निधीचा अपहार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदाशिव निकम करत असून, कंपनीचे आर्थिक व्यवहार, बँक खात्यांचा तपशील, निधीचा प्रवाह आणि इतर संभाव्य पीडित गुंतवणूकदारांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai